आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. चिन्मय मांडलेकर हा लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती अशा अनेक बाजू समर्थपणे सांभाळताना दिसतो. त्याने आतापर्यंत विविध मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटातही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. चिन्मय मांडलेकर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या नावावरुन अनेकदा ट्रोल केले जाते. आता यावर चिन्मयने भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिन्मय मांडलेकर आणि नेहा मांडलेकर यांनी त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. यावरुन त्याला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शिवराज अष्टक या आठ चित्रपटांच्या मालिकेत तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. यादरम्यान एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याने मुलाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. 


"…म्हणून मुलाचं नाव जहांगीर ठेवलं"


"माझ्या मुलाचा जन्म जमशेदी नवरोसच्या दिवशी झाला. त्यामुळे मी भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या नावावरुन त्याचं नाव जहांगीर असं ठेवलं. भारताला एअर इंडिया आणि टायटन सारख्या अनेक कंपन्या देणाऱ्या मोठ्या माणसाचं नाव आपल्या मुलाला द्यावं, हा त्यामागचा हेतू होता", असे चिन्मय मांडलेकर यावेळी म्हणाला.   


यापुढे तो म्हणाला, फर्जंद चित्रपटावेळी जहांगीर तीन ते चार वर्षांचा होता. त्यावेळी आमच्या एका मित्राने त्याला छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट म्हणून दिली होती. आजही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर जहांगीर गणपती बाप्पा आणि महाराजांच्या त्या मूर्तीच्या पाया पडतो. 



पत्नीनेही ट्रोलर्सला सुनावलं


त्यासोबत चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकरने याबद्दल एक सविस्तर पोस्ट लिहिली होती. त्यात तिने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले होते. “प्रिय ट्रोलर्स, ह्याचा आता कंटाळा आलाय. अजून किती काळ तुम्ही ९ वर्षांच्या मुलाला लक्ष्य बनवणार आहात? प्रत्येकवेळी त्याच्या वडिलांचा नवा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी? जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे देशद्रोही नव्हते. या देशासाठी या महापुरुषाने जे काही मिळवलं आहे, त्याचा अनेकांना लाभ झाला आहे. आमच्या मुलाचे नाव आम्ही त्यांच्या नावावरुन ठेवलेले आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे.


पण मी हे सर्व कोणाला सांगतेय? त्यांना हे अगोदरपासून माहित नाही का? हे लोक द्वेषाने आंधळे झाले आहेत. ही लोक काहीतरी निमित्त शोधत असतात. संस्कार, संस्कृती नेमके काय असतात? अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्टं’ म्हणून करणारे संस्कार असतात! त्याच्या आईबद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं? आम्ही माणुसकी, प्रेम जपणारी माणसं आहोत. माझे संगोपन आणि मूल्ये अशा चेहर्‍याविरहित हल्ल्यांचा निषेध करतात, हे सहन करण्यास मनाई करतात”, असे चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहाने म्हटले होते.