मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला वेड या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले. याबद्दल रितेश देशमुखने एक पोस्ट शेअर केली होती. आता त्यावर जिनिलिया देशमुख आणि अभिनेता जितेंद्र जोशीच्या संभाषणाने लक्ष वेधून घेतले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत जिनिलिया आणि रितेशच्या हातात ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यातील ट्रॉफी पाहायला मिळत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने ‘वेड’ चित्रपटाने एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरल्याचे सांगितलं आहे. यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट चित्रपट यांसारख्या अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. 



जितेंद्र जोशी काय म्हणाला?


रितेशच्या या पोस्टवर अभिनेता जितेंद्र जोशीने एक कमेंट केली आहे. 'भाऊ खूप खूप अभिनंदन', अशी पोस्ट जितेंद्रने केली आहे. त्यावर जिनिलीयाने प्रतिक्रिया देताना 'आणि मला' असा प्रश्न त्याला विचारला आहे. त्यावर जितेंद्रने फारच सुंदर उत्तर दिले आहे. 


"जिनिलिया वहिनी आहो तुम्ही आहात म्हणून तर भाऊ आहेत. त्यांनी तुमच्यासाठी आणि तुमच्याबरोबर राहून हे करुन दाखवलं. त्याचेच हे फळ आहे. त्यामुळे तुमचे पहिलं अभिनंदन आणि त्यानंतर भाऊचंही अभिनंदन", अशी प्रतिक्रिया जितेंद्र जोशीने दिली आहे. जितेंद्र जोशीची ही प्रतिक्रिया वाचून अनेक चाहते यावर कमेंट करत आहेत. तसेच त्यांचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 



रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता या चित्रपटाला 9 पुरस्कार मिळाले आहेत. रितेशने ही पोस्ट शेअर करताना हटके कॅप्शनही दिले होते. "किती सुंदर रात्र होती. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात 'वेड' या चित्रपटाला इतके पुरस्कार मिळाले. आम्हाला दिलेल्या या सन्मानाबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत. आम्हाला ज्या ज्या लोकांनी मतं दिली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. झी टॉकीजचेही धन्यवाद. मला हे आयुष्यभर लक्षात राहिल", असे रितेश देशमुखने म्हटले होते.