Kiran Mane On Vasant more : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम पाहायला मिळत आहे. येत्या 19 एप्रिलला राज्यातील काही मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तीन उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पुण्यातील निवडणूक तिरंगी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. सध्या हे तिन्ही उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहे. त्यातच आता अभिनेते किरण माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे यांचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण माने हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांनी नुकतंच वसंत मोरे यांनी मनसेला रामराम करताना शेअर केलेले दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी वसंत मोरे यांचे कौतुक केले आहे. वसंत मोरे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण त्याबरोबर त्यांनी पुण्यातून रवींद्र धंगेकरच निवडून यावेत, ही माझी इच्छा असल्याचेही स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. 


किरण मानेंनी केले वसंत मोरेंचं कौतुक


...बरेच दिवस यावर बोलायचे होते. बाकी काही का असेना वसंत मोरे या नेत्याची ही वृत्ती माझ्या मनाला भावली. आधी एक सांगतो...पुण्यातून रविंद्र धंगेकरच निवडून यावेत ही माझी इच्छा आहे. मला वेगळं बोलायचंय. कुठलाही नेता पक्ष सोडतो आणि दुसर्‍या पक्षात जातो...  हे त्याचं संवैधानिक स्वातंत्र्य असतं. मतभेद होतात. काही मजबुरी असते किंवा राजकीय स्वार्थही असतात... वेगळं व्हावं लागतं. पण हे करताना, पुर्वी आपण ज्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलाय... तिथल्या वरिष्ठांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला वेळोवेळी उमेदवारी दिली... अनेक महत्त्वाची पदं दिली... आपल्याला मोठं केलं... नांव दिलं... पैसा दिला... समृद्धी दिली... त्या वरीष्ठांशी राजकीय नातं तोडलं तरी माणसात 'कृतज्ञता' नांवाची एक गोष्ट असते... ती टिकवली तरच त्या नेत्याचे चारित्र्य दिसते. त्याच्यावरचे संस्कार दिसतात. 'माणूस' म्हणून तो विश्वासार्ह ठरतो. राजकारणी म्हणून नीतीवान सिद्ध होतो.


जे नेते पक्ष सोडल्या-सोडल्या वरिष्ठांची निंदानालस्ती सुरू करतात... दोषारोप सुरू करतात... पुर्वी आपण ज्या नेत्यांच्या पाया पडत होतो... आदराने झुकत होतो... त्यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद शब्दांत हेटाळणी करतात... ते खरंतर स्वत:ची लायकी दाखवतात. टीका करताना वयाचाही मान ठेवत नाहीत. आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवत नाहीत. 'माणूस' म्हणूनही असे लोक नीच असतात. राजकारणी म्हणून अत्यंत चारित्र्यहीन, निर्लज्ज असतात. ते कुणाचेच नसतात. ना स्वत:च्या कार्यकर्त्यांचे-ना जनतेचे. 


हल्ली अशा बेईमानी पिलावळीचा उच्छाद सुरू आहे राजकारणात. म्हणून या दलदलीत वसंत मोरेंसारखा राजकारणी लक्ष वेधून घेतो. मनाला भावतो. पक्ष सोडताना राज ठाकरेजींच्या फोटोला साष्टांग नमस्कार करून पक्ष सोडला. नंतरही दोषारोप नाहीत. राज ठाकरेंनाही मी त्याबाबतीत मानतो. त्यांनीही कधी बाळासाहेबांची निंदा केली नाही. पवारसाहेबांना सोडून गेलेल्या सुशिलकुमार शिंदेंनीही कायम जाण ठेवली की मी जो आहे तो पवारसाहेबांनी मला राजकारणात आणलं म्हणून... किंवा विजयसिंह मोहिते पाटलांनी कधी पवारसाहेबांची पातळी सोडून नालस्ती केली नाही. याला म्हणतात राजकारणातला 'माणूस'. वसंतराव मोरे, तुम्ही तोच माणूसकीचा आदर्श जपलात. हे पहा, आमचा पाठिंबा कायम धंगेकरांना राहील. ते ही तुमच्यासारखेच 'माणूसपण' जपणारे आणि म्हणूनच सर्वसामान्यांची जाण असणारे उमदे नेते आहेत. पण पक्ष सोडताना तुम्ही केलेल्या या आदर्श कृतीबद्बल सलाम वसंतराव... मनापासून सलाम, असे किरण माने यांनी म्हटले आहे. 



दरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तिघे निवडणूक लढवत आहेत. सध्या हे तिघेही जोरदार प्रचार करताना दिसत आहे. त्यामुळे यंदा पुणेकर कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.