Kiran Mane Upcoming Movie : 'मुलगी झाली हो' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणून किरण मानेंना ओळखले जाते. सध्या ते मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. किरण माने यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही हजेरी लावली. सध्या ते सिंधुताई माझी माई या मालिकेत झळकत आहेत. त्यातच किरण माने आता लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. त्यात त्यांची भूमिका काय असणार, याबद्दलचा खुलासाही त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण माने हे फेसबुकवर सतत सक्रीय असतात. त्यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 'तेरवं' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. यात ते मधुकर हे पात्र साकारताना दिसणार आहेत. 


किरण मानेंची नव्या चित्रपटासाठी पोस्ट


"बिगबॉस मधनं बाहेर आल्यावर मला जे सिनेमे मिळाले त्यातला पहिला सिनेमा रिलीज होतोय - 'तेरवं' ! 'शेतकरी' हा माझ्या काळजाच्या लै आतला विषय. शेतकर्‍याची व्याख्या लै वेगळी हाय भावांनो. आपल्या वाट्याला आलेल्या तीनचार एकरात मरनाचे काबाडकष्ट करून धान्य, भाजी, फळं पिकवनारा शेतकरी ह्यो 'खरा' शेतकरी. पाचपन्नास एकरवाले 'शेतीशिवाय मज्जा नाय' वाले बागायतदार वेगळे. तो आपला विषय नाय. अल्पभूधारक, कोरडवाहू पोशिंद्याचं आपल्या देशात जे शोषण होतंय ते लै लै लै भयानक हाय !


पन सिनेमाची गोष्ट फक्त त्या शेतकर्‍याची नाय... तर त्याहून जास्त त्याच्या बायकोची -'जना'ची हाय ! अशा असंख्य 'जना' आज विपरित परिस्थितीशी लढा देतायत. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांबद्दल सगळेच बोलतात. पन त्यांच्या विधवांचं पुढं काय होतं??? आत्महत्या होऊ घातलेल्या शेतकर्‍यांच्या असंख्य बायका सतत भितीचं भूत डोक्यावर घेऊन कसं जगत असतील??? सिनेमाची नायिका जना आणि नायक सुधाकर यांच्या विरोधात उभा रहाणारा 'मधुकर' साकारतोय मी. स्क्रीप्ट वाचताना एक 'माणूस' म्हणून या मधुकरची खुप चीड येत होती... पन ती भुमिका साकारताना स्वत:मधला 'अभिनेता' मात्र खुप समाधानी होत होता. 


आपन जसं वागू शकत नाय, तसं वागायला मिळनं... आनि त्या निमित्तानं गढुळ मनांचं अंतरंगबी तपासायची संधी मिळनं... हे तर कलावंत असन्याचं फळ हाय ! ८ मार्चला रिलीज होतोय... श्याम पेठकर यांनी लिहीलेला, सुरेश देशमाने यांनी कॅमेर्‍याच्या लेन्समधून टिपलेला आणि विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणारा अस्सल रंगकर्मी हरीश इथापे याने दिग्दर्शित केलेला - 'तेरवं' नक्की बघा", असे किरण माने यांनी म्हटले आहे. 



किरण मानेंच्या आगामी तेरवं या चित्रपटाचे दिग्दर्शन हरिष इथापे यांनी केले आहे. तर श्याप पेठकर यांनी कथा-पटकथा-संवादलेखन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र जिचकार यांनी केली आहे. येत्या 8 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.