Mahesh Manjrekar On Trollers : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते- दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना ओळखले जाते. सध्या महेश मांजरेकर हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जुनं फर्निचर असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या ते या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. आता एका मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकरांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यावर अनेक कलाकार हे प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. आता महेश मांजरेकरांनी ट्रोलिंगवरुन संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन', असे वक्तव्य यावेळी महेश मांजरेकरांनी केले. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केले. 


त्याबद्दल बोलायचा तुम्हाला हक्क आहे


“मला या गोष्टीचा भयंकर राग येतो. राग यायलाही हवा. लोक म्हणतात ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करा. पण दुर्लक्ष का करायचं? कोणी हक्क दिला तुम्हाला? मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक चित्रपट बनवतो, तो तुम्ही पाहिला, तुम्ही तो पाहण्यासाठी पैसे मोजले, त्यामुळे त्याबद्दल बोलायचा तुम्हाला हक्क आहे. मला सिनेमा आवडला नाही आणि माझे पैसे फुकट गेले किंवा मला आवडला आणि माझे पैसे वसूल झाले. तुम्ही मला क्रिएटिव्हली क्रिटीसाईज केलं तर माझं काहीच म्हणणं नाही. कारण तुम्ही माझे प्रेक्षक आहात आणि मी तुमच्या आवडीचा आदर करतो. 


अशा लोकांना का माफ करावं?


पण मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडील, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क कोणाला नाही. मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन. तुम्ही माझ्या कामावर बोला, पण दरवेळी माझ्या आईला का बोलता? मी तुम्हाला वैयक्तिक काही म्हणालो आहे का? एकदा तर माझ्या मुलीबद्दल मी इतकं वाईट काहीतरी लिहिलं होतं, मी त्याला शोधलं आणि त्याच्या विरोधात तक्रार केली. अशा लोकांना का माफ करावं? हे सर्व तेव्हाच संपेल जेव्हा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी एक कायदा तयार केला जाईल.” असे महेश मांजरेकरांनी म्हटले. 


दरम्यान सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट आज 26 एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर,  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. तर यतिन जाधव हे 'जुनं फर्निचर'चे निर्माते आहेत.