`उशिरा पोहोचलो म्हणजे आपण मोठे स्टार...`, मिलिंद गवळींनी टोचले कलाकारांचे कान; म्हणाले `बेशिस्त, आळसी...`
`बरेचशा लोकांना जर उशीर झाला तर वाट बघणाऱ्याची ते क्षमासुद्धा मागत नाहीत`, असे मिलिंद गवळींनी म्हटले.
Milind Gawali Importance Of Time : 'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारत आहे. मिलिंद गवळी हे सतत विविध गोष्टींबद्दल पोस्ट करताना दिसतात. आता मिलिंद गवळींनी अनेक कलाकारांना वेळेचं महत्व सांगितले आहेत.
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. आता मिलिंद गवळींनी पारंपारिक लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी वेळेबद्दल भाष्य केले आहे. यात त्यांनी कोणी वेळेवर येवो न येवो आपण आपली वेळ पाळली पाहिजे, असा सल्ला चाहत्यांना दिला आहे.
मिलिंद गवळींची पोस्ट
“वेळ” “time” Time waits for none. वेळ एकदा निघून गेली की ती परत कधी येत नाही, म्हणून वेळेचे महत्व जाणं खूप महत्त्वाचं आहे, स्वतःच्या वेळे पेक्षा दुसऱ्याच्या वेळेचे महत्व जाणणं अधिक महत्त्वाचं, खूपशा लोकांना इतरांच्या वेळेची कदर नसते, दिलेली वेळ न पाहणारे असंख्य लोकं आहेत, बरेचशा लोकांना जर उशीर झाला तर वाट बघणार्याची ते क्षमासुद्धा मागत नाहीत, बऱ्याचशा लोकांना हे माहितीच नसतं , सातत्याने उशीर करणं म्हणजे ते चूक आहे,
कदाचित कधीतरी त्यांच्यावर ज्या वेळेला वेळ येईल, त्यावेळेला त्यांना वेळेचं महत्व कळेल, मला वेळेत पोहोचायची सवय शाळेतच लागली होती, वेळेवर बस स्टॉप वर पोहोचलं नाही, तर स्कूल बस निघून जायची, आणि शाळेत उशिरा पोहोचलं की कर्णीक टीचर , गोखले टीचर, वर्गीस प्रिन्सिपल वर्गा बाहेर उभा करायचे, आमच्या शाळेत बरीचशी मुलं लांबून लांबून दादरला वेळेत शाळेत पोहोचायची, पण सुबोध हळदणकर नावाचा आमचा मित्र अगदी जवळ राहायचा, दोन-चार बिल्डिंग सोडून, तरी नेहमी उशीरा यायचा, मग दहावीनंतर भोसला मिलिटरी स्कूल, नाशिकला मी गेलो, तिथे कोणाला उशिरा यायची हिंमतच व्हायची नाही, उशिरा येईल त्याला रायफल घेऊन ग्राउंडवर दहा राऊंड मारायला लागायचे.
कधी कधी तर crawling , ते पण रायफल घेऊन, गुडघे ढोपरं सगळी फुटायची. मला असं वाटतंय एवढा सगळा त्रास करून घेण्यापेक्षा, वेळेत पोहोचायला काय हरकत आहे, पण नाही काही लोकांना शिव्या खायची सवय असतेचं, मिलिटरी मध्ये असते ती शिस्त, आणि या आमच्या कलाक्षेत्रात काही लोकांमध्ये असते ती बेशिस्त, कुठेतरी चुकीचे शिक्षण घेऊन आलेली असतात, वेळेवर पोहोचणारे म्हणजे काही फार महत्त्वाची लोकं नाहीत, आपण उशिरा पोहोचलो म्हणजे आपण मोठे Star आहोत असं काहींना वाटतं किंवा काही तर चक्क आळशीच असतात.
पण खरं सांगू का वेळेत पोहोचायची एक वेगळी मजा असते, एक प्रकारची नशा असते, आपल्या कामाविषयी चा आदर असतो, उत्सुकता असते, वाट बघणाऱ्या माणसाविषयी प्रेम असतं, respect असतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, विस्कळीत झालेल्या traffic, public transport यामुळे कधीतरी कोणीतरी उशिरा येऊ शकतो, पण सतत तेच कारण असू शकत नाही, आमच्याकडे गिरगांव मालाड कल्याण वर्ण वेळेवर येणारी लोक आहेत, आणि सुबोध हळदणकर सारखी सुद्धा आहेतच. तर कोणी वेळेवर येवो न येवो आपण आपली वेळ पाळली पाहिजे, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.
दरम्यान मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.