मराठी अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) आपली परखड मतं मांडत असतो. 'जबरदस्त' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या पुष्कर जोगने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बिग बॉसमुळे त्याच्या प्रसिद्धीत वाढ झाली आणि त्याची लोकप्रियता वाढली. पुष्कर जोग सामाजिक, राजकीय तसंच चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर तो भाष्य करत असतो. अशातच त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्कर जोगने इंस्टाग्रामला एक स्टोरी शेअर केली असून यामधून त्याने आपल्या भावना मांडल्या आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, घटना यांचा संदर्भ देत पुष्करने ही पोस्ट केल्याचं दिसत असून यात तो भावनिक झाल्याचंही दिसत आहे. त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले अशा शब्दांत त्याने आपली खंत व्यक्त केली आहे. तसंच जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक असंही म्हटलं आहे. अजून १२ वर्षे आहेत असं सांगत त्याने अप्रत्यक्षपणे इशाराही दिला आहे. 


पुष्करने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, "सगळ्यांसाठी सगळं केलं. खरा वागलो. जेव्हा जेव्हा मानसिकरित्या खचतो तेव्हा आपले कोण कोण हे शोधतो. आई आणि मुलगी. नशिबवान आहेत ते सर्व ज्यांना काळजी घेणारे मित्र आहेत. जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक. मी गेल्यावर कुणी कुणी यायचं यांची यादी देऊन जाईन मी. उगाच किती वाईट वाटलं याचा आव आणून येऊ नका".



“अजून 12 वर्षे आहेत. राष्ट्रीय आणि ऑस्कर पुरस्कार जिंकायचा आहे. आई-बाबांसाठी लीजेंड (Legend) होऊनच जाईन, आई आणि फेलीशा तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले,” असंही त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, पुष्करने या पोस्टच्या माध्यमातून नेमकं कोणाबद्दल भाष्य केलेलं हे सांगितलेलं नाही. मात्र त्याचा इशारा काही जवळच्या लोकांसाठी असल्याचं स्पष्ट दिसत आहे.