Sharad Ponkshe Post Article 370 : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातून जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती निर्माण झाली हे दाखवण्यात आले होते. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचे समीक्षकांसोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनीही कौतुक केले होते. आता या चित्रपटाबद्दल मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमात दमदार अभिनयानं वेगळी छाप उमटवली आहे. ते अभिनयासोबत कायमच त्यांचे परखड विचार मांडताना दिसतात. शरद पोंक्षे यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दलही सांगितले आहे. 


‘आर्टिकल 370’ पाहिल्यानंतर शरद पोंक्षे काय म्हणाले?


"Netflix वर आता तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने काय पावल ऊचलली? कॉंग्रेसने काय वाटोळं केल ते कळेल. कोणी म्हणेल की खोटा ईतिहास दाखवलाय ज्याला जे म्हणायच ते म्हणू दे पण प्रत्येकान पाहिला पाहिजे. आणि हो मतदान मात्र नक्की करा. राष्ट्रसर्वतोपरी", असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. 


शरद पोंक्षेंच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर काहींनी हा चित्रपट 'खरंच उत्तम' असल्याचे म्हटले आहे. तर एकाने 'अप्रतिम सिनेमा आहे, एकदा तरी नक्की बघावा', अशी कमेंट केली आहे. 



दरम्यान ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी 19 एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे बजेट फक्त 20 कोटी रुपये होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 77 कोटींची कमाई केली होती. 


जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. यानंतर काश्मीरच्या खोऱ्यात काय परिस्थिती निर्माण झाली, यावर ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटात अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार आणि इरावती हर्षे मायादेव हे कलाकारही झळकले होते.