`चुकीचं मत देशाला पुन्हा 25 मागे नेणार...`, शरद पोंक्षेंची `ती` पोस्ट चर्चेत
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांकडून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर करत मतदानाचे आवाहन केले आहे.
Sharad Ponkshe Appeal For Voting : सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडी आणि महायुती असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकांच्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिल 2024 रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांकडून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर करत मतदानाचे आवाहन केले आहे.
शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. आता शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पुस्तकातील दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोखाली काही जुने उल्लेख पाहायला मिळत आहे. यातील पहिल्या फोटोखाली कराची येथे सावरकरांची भव्य मिरवणूक असे नमूद करण्यात आले आहे. तर दुसऱ्या फोटोत गांधी आणि जीना यांच्या बैठकींपैकी एका बैठकीबद्दल नमूद केले आहे.
शरद पोंक्षे काय म्हणाले?
या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी मतदानाचे आवाहन केले आहे. वाचा व ठरवा मतदान कोणाला करायचं ते. चूकीचं मतदान हे देशाला पुन्हा २५ वर्ष मागे नेणार आहे. “ज्या देशातील बहूसंख्यांकांचा सतत अपमान होतो तो देश कधीही प्रगती करू शकत नाही” स्वा सावरकर. गेल्या दहा वर्षात बहूसंख्य जरा ताठ मानेनं जगू लागलेत. मतदान अत्यंत महत्वाचं आहे. राष्ट्र सर्वतोपरी, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
दरम्यान शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका हा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं वेगळी छाप उमटवली आहे. आपल्या अभिनयाबरोबरच त्यांचे परखड विचार हे नेहमी चर्चेचा विषय असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व याविषयी शरद पोंक्षे व्याख्यानं देत असतात. काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. शरद पोंक्षे हे त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षेसोबत काम करणार आहेत.
वि. एस. प्रोडक्शन्स आणि मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावाने होत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या रोहिणी विजयसिंह पटवर्धन या आहेत. तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षेने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाप-लेकाची जोडी एकत्र काम करणार आहे.