Sharad Ponkshe Lok Sabha Election 2024 : सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम पाहायला मिळत आहे. त्यातच आता अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. अभिनेता गोविंदाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करत शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले आहे. त्यानंतर आता आणखी एका मराठी कलाकाराने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात सक्रीय असलेले मराठी अभिनेते म्हणून शरद पोंक्षे यांना ओळखले जाते. ते कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. शरद पोंक्षे हे अभिनयाबरोबरच परखड मतही मांडताना दिसतात. ते सोशल मीडियावरही सक्रीय असते. काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटात पक्षप्रवेश केला. यानंतर आता त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली. 


"मला बोरिवलीतून निवडणूक लढवायला आवडेल"


"जर मला एखाद्या राजकीय पक्षाकडून विचारणा झाली तर लोकसभा निवडणूक लढवायला नक्की आवडेल. मी बोरिवलीमध्ये राहत असून माझा मतदारसंघही तोच आहे. त्यामुळेच मला बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल. माणसाने जिथे राहतो, तिथूनच लढावं. कारण त्या ठिकाणी राहणारे लोक तुम्हाला वर्षानुवर्षे ओळखत असतात. जर एखाद्या भलत्याच ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहिलो, तर त्या ठिकाणची माणसं तुम्हाला ओळखत नाहीत. आपण आपल्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी लढावं. आपण जे काही केलंय, ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, मग मत द्यायचं की नाही याचा निर्णय ते लोक घेतील", असे शरद पोंक्षे यावेळी म्हणाले. 


सध्या महाराष्ट्रातील राजकारण खूपच भयानक झालं आहे. महाराष्ट्रात सर्व पातळ्या सोडून राजकारण सुरू आहे. सुसंस्कृतपणाचा लवलेशही दिसत नाही. पण यातून प्रत्येक क्षेत्र जात असतात. कोणतीही स्टेज कायमस्वरुपी राहत नाही. त्यामुळेच 2024 ची निवडणूक ही भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची निवडणूक असणार आहे, असेही शरद पोंक्षेंनी म्हटले. 


सध्या सिक्कीममध्ये शूटींग सुरु


दरम्यान शरद पोंक्षे हे काही दिवसांपूर्वी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात झळकले होते. या नाटकाने 26 जानेवारी 2023 रोजी कायमस्वरुपी प्रेक्षकांचा निरोप घेतला. नथुराम गोडसे या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पार पडला. सध्या ते सिक्कीममध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत.