Shashank Ketkar Revisit Thane : मराठी मालिकाविश्वात सातत्याने सक्रीय असलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून शशांक केतकरकडे पाहिले जाते. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने श्रीरंग गोडबोले हे पात्र साकारले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. आता शशांक केतकरने चक्क मास्क न घालता ठाण्यात फेरफटका मारला आहे. त्याचा एक व्हिडीओही त्याने पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशांक केतकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. शशांक हा काही वर्ष त्याच्या कुटुंबासोबत ठाण्यात वास्तव्यास होता. नुकतंच शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो ठाण्यातील राम मारुती रोड, तलावपाळी या ठिकाणी फिरत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याने तोंडावर मास्क न लावता फेरफटका मारल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. 


शशांक केतकरची पोस्ट


"कधी कधी आपण आपल्याच शहरात फिरायचं विसरतो. काल सुट्टी मिळाली… ठरवून मी आणि प्रियांका अगदी ऋग्वेद च्या वयाचे होऊन आमच्या ठाण्यात फिरलो. मी इयत्ता १० वी पर्यंत ठाण्यात होतो. शाळेत असताना मित्रांबरोबर तलावपाळी ला यायचो, राम मारुती रोड वर फिरायचो, भेळ खायचो, मिसळ खायचो. त्यानंतर होणार सून च अनेकदा shooting ही इथेच केलं! काल त्या सगळ्या आठवणींना पुन्हा एका revisit करता आलं", असे शशांक केतकरने म्हटले आहे. 



शशांक केतकरच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. "त्यासाठी अशी दृष्टी असावी लागते. तुम्हाला असं पाहून फार आनंद होतोय, असेच पुण्यात पण या", असे एकाने म्हटले आहे. तर एकाने "दादा सातारा la कधी येणं होतं का.. आजोळ आहे ना तुमचं", असा प्रश्न विचारला आहे. 


दरम्यान, शशांक केतकरने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या तो ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तो प्रमुख भूमिका साकारत आहे.  त्याबरोबरच तो ‘तेलगी स्कॅम २००३’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. त्यानंतर आता लवकरच शशांक धर्मा प्रोडक्शन अर्थात करण जोहरची निर्मिती असलेल्या आगामी सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचं नाव ‘शो टाइम’ असे आहे. ही बहुचर्चित सीरिज येत्या ८ मार्चला प्रदर्शित केली जाणार आहे.