Subodh Bhave : सुबोध भावेंचं आधी बेधडक वक्तव्य, आता घूमजाव...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
मुंबई : मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी राज्यातील राजकारणावर बेधडक वक्तव्य केलं होतं. त्यांनी या भाषणातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. मात्र आता सुबोध भावे यांनी आपल्या या भूमिकेवरुन घूमजाव केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं म्हणत भावेंनी म्हंटलंय. तसेच संपूर्ण भाषण पाहिल्यावर तुम्हाला त्याच चूकीचं वाटलं तर मी क्षमाही मागतो, असंही भावेंनी नमूद केलंय. भावेंनी फेसबूक पोस्ट करत आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
सुबोध भावेंच्या पोस्टमध्ये काय?
नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे.त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ, (कुठेही कट न करता जसाच्या तसा). आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा "संपूर्ण भाषण" त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.
सुबोध भावे काय म्हणाले होते?
'लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम दिलंय.' असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकारणावर मनातील खदखद व्यक्त केली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या 'डीईएस प्री-प्रायमरी स्कूल' तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यातिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
भावेंनीं शिक्षण पद्धतीवर देखील आपलं मत मांडलं होतं. "आपण प्रत्येक जण उत्तम शिक्षण घेतो, करियरच्या मागे लागतो. चांगली नोकरी कशी मिळेल या प्रयत्नात असतो. परदेशात जाऊन स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. अशा विचारांमुळे लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम दिलंय. म्हणून देश निर्मितासाठी पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल", असंही भावे म्हणाले होते.
"राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही. ते काय करतील हे चित्र आपल्या समोर आहे.' असं म्हणत भावेंनी राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती.
राज्यपालांचा समाचार
'पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजं रोवून त्यांना देशासाठी उभं करणं आवश्यक आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावं यासाठी देशार शिक्षण व्यवस्था आणली. आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रातून निघून गेले तर पैसेच राहणार नाहीत. अशी वक्तव्यं करण्यास काही राजकारणी धजावतात", अशा शब्दात भावेंनी राजकारणावर नाराजी व्यक्त केली होती.
"आता आपण मुलांना हिंदी आणि मराठी गाण्यांवर नाचायला शिकवतो. सिनेमांमधील डायलॉग बोलायला लावतो, असं करून देश घडणार नाही. याऐवजी जर मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले, तर त्यांच्यात देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल' असा विश्वास देखील सुबोध भावे यांनी यावेळी व्यक्त केला होती.