मुंबई : विविध चित्रपट आणि 'तुला पाहते रे' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या मराठी अभिनेता सुबोध भावे याने त्याच्या फेसबुक पेजवरुन एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना एक महत्त्वाचा संदेश देत त्यांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. कलाकार म्हणून आपल्याला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम आणि लोकप्रियता या साऱ्याचा वापर करुन कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये, ही बाब त्याच्या पोस्टमधून अधोरेखित करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''माझा सख्खा भाऊ 'सूनीत' सोडून 'भावे' आडनाव लावणारा माझा कोणीही भाऊ नाही आणि जर कोणी मला भेटवण्यासाठी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेऊ नका. 
तुमचा,
सुबोध सुरेश भावे'',
असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेमुळे आणि चित्रपटातील विविध भूमिकांमुळे सुबोध प्रकाशझोतात आला आहे. त्याच्या वाटयाला आलेली प्रसिद्धी आणि तरुणींमध्ये त्याच्याप्रती असणारं वेड पाहता आपल्या कोणत्याच चाहत्यांची फसवणूक होऊ नये हाच मानस ठेवत त्याने ही पोस्ट लिहिल्याचं कळत आहे. 



आपल्या आवडत्या कलाकाराची भेट घेण्याची सर्वच चाहत्यांची इच्छा असते. पण, अनेकदा याच इच्छेपोटी चाहत्यांची काही तोतयांकडून फसवणूकही करण्यात येते. कलाकारांची भेट घडवून आणण्यासाठी पैसेही आकारले जातात. असा कोणताही चुकीचा प्रकार घडू नये याचसाठी सुबोधने ही पोस्ट केली आहे.