`हे २० मीटरचं अंतर गाठू तेव्हा आपला देश बदलेल`
सोशल मीडियावर सुबोध भावेच्या ट्विटची चर्चा
मुंबई : केंद्र सरकारने नागरिकांना चांगले आरोग्य आणि स्वच्छ पर्यावरण मिळावे म्हणून 'स्वच्छ भारत अभियाना'ची सुरूवात केली. ‘स्वच्छ भारत अभियान: एक कदम स्वच्छता की ओर’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो पण हे वाक्य आता फक्त बोलण्यापूरती मर्यादीत राहिलं आहे. कारण अद्यापही देशातील नागरिक या अभियानाबद्दल जागृत नसल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येतं.
मराठी अभिनेता सुबोध़ भावे याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने एका फोटोच्या माध्यमातून नागरिक कशाप्रकारे 'स्वच्छ भारत अभियाना'कडे पाठ फिरवत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “जेव्हा आपण हे २० मीटरच अंतर गाठू तेव्हा आपला देश आपोआप बदलेल… आपला देश, स्वच्छ देश” असे लिहित त्याने आपला संताप व्यक्त केला.
जवळ कचरा पेटी असून देखील २० मीटर अंतरावर कोण्या एका व्यक्तीने पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या आहेत. त्याने केलेलं ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तर त्याच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
सुबोध भावे नेहमी सामाजिक मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडत असतो. आता देखील त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. तर महात्मा गांधींच्या १५०व्या जन्म शताब्दीनिमित्त 'स्वच्छ भारत अभियाना'ची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.