Ashwini Mahangade Support Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला आंदोलन करायचं आहे, पण तोडगाही काढायचा आहे. म्हणून लोणावळ्यात थांबलो होतो. पण आता आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु झाल्यानंतर जरी तोडगा निघाला तरी माघार घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता यावर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हायरल फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तिने एक लांबलचक पोस्ट शेअर करत यावर भाष्य केले आहे. 


अश्विनी महांगडेची पोस्ट


साधं फिरायला जावून घरी परतलो तरी पुढचे 2 ते 3 दिवस "फार दमलो" म्हणत काढतो आपण. पण हा माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्नं आहे की आता तरी न्याय मिळेल. हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणाप्रती असलेल्या सातत्याने, समाजाप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला, टिकवला, वाढवला. म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते. हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल.


टीप - माझे कलाकार म्हणून काम पाहणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत तर ते 12 बलुतेदार, 18 पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही, समाजातील सर्वच घटकांना समान न्याय मिळावा हेच माझे मत, असे अश्विनी महांगडेने म्हटले आहे. 



सध्या अश्विनीची ही पोस्ट व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. अश्विनी ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत झळकत आहे. यात ती अनघा हे पात्र साकारत आहे. याशिवाय ती लवकरच धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तसेच ती 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटाद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.