`...तर राजकारणात यायला नक्कीच आवडेल`, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे वक्तव्य, म्हणाली `सगळ्या जाती-धर्मांना एकत्र...`
अश्विनी ही अभिनय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही सक्रीय असते. नुकतंच अश्विनीने राजकारणात सक्रीय होण्याबद्दल भाष्य केले आहे.
Ashwini Mahangade On Joining Politics : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. यात ती अनघा हे पात्र साकारत आहे. अश्विनीला मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. अश्विनी ही अभिनय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही सक्रीय असते. नुकतंच अश्विनीने राजकारणात सक्रीय होण्याबद्दल भाष्य केले आहे.
अश्विनी महांगडे हे राजकीय विषयांवर नेहमीच स्पष्ट मत मांडताना दिसते. ती अनेकदा शिवरायांचे विचार, सध्याची राजकीय परिस्थिती, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर वक्तव्य करत असते. आता नुकतंच अश्विनीने लोकमत फिल्मी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुला राजकारणात यायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने “मी आताही राजकारणात आहे कारण, मी एक मतदार आहे. मतदार हा राजकारणातील सर्वात मोठा भाग आहे. कोणी आमदार आहेत, कोणी खासदार आहेत पण, यापेक्षा त्यांना निवडून देणारा मतदार हा सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे पुढे जाऊन जर मला संधी मिळाली, तर लोकांसाठी काम करायला नक्की आवडेल. यामुळे माझाही आवाका वाढेल”, असे अश्विनी महांगडेने म्हटले.
"मला माझ्या वडिलांपासून राजकीय गाभा लाभलेला आहे. कारण अगदी सरपंच पदाच्या निवडीपासून ते खासदारकीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ते सहभागी असायचे. वडिलांच्या मागे प्रत्येक गोष्टीत आम्ही देखील सहभागी व्हायचो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी घरातच शिकले आहे. त्यामुळे जर संधी मिळाली तर राजकारणात एक वेगळा अपवाद तयार करायला मला नक्कीच आवडेल. पण, सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे. अशावेळी मी नेमकी कोणती विचारधारा स्वीकारावी याचा प्रश्न मला पडतो. आपला भारत हा सगळ्या जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा देश आहे. पण, आता आपण आपल्यातंच एवढी भांडणं करतो की, एकत्र कधी येणार? इतर गोष्टींवर चर्चा कधी करणार असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे या सगळ्यावर मला बोलायची संधी मिळाली, तर निश्चितपणे आवडेल” असे अश्विनी महांगडेने म्हटले.
दरम्यान अश्विनी ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबरोबरच अनेक मालिकांमध्ये झळकली. झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिने राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने ‘मेरे साई’ या मालिकेतही काम केले होते. या मालिकेतील तिच्या पात्राचे कौतुक केले गेले. आता लवकरच अश्विनी ही ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.