अशोक सराफ यांना `महाराष्ट्र भूषण` जाहीर झाल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली `ते 6 महिने...`
तिने एका जुन्या नाटकादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अशोक सराफ आणि हेमांगी कवी दिसत आहे.
Hemangi Kavi Special Post For Ashok Saraf : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा केली आहे. अशोक सराफ यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने त्यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
मराठीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आता तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एका जुन्या नाटकादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अशोक सराफ आणि हेमांगी कवी दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने एक खास पोस्ट केली आहे.
हेमांगी कवीने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
"महाराष्ट्र भूषण! खूप खूप अभिनंदन भाई! पुरस्कार तुम्हांला मिळालाय पण उर आमचा भरून आलाय! एक अख्खी पिढी तुम्हांला बघत मोठी झाली आणि अजून ही तुम्हांला पाहीलं की आमच्या काळातला ‘The Superstar’ म्हणून छाती फुगवून घेतोय! एवढ्या ताकदीचं काम करून ठेवलंय तुम्ही! आज तुम्हांला ‘महाराष्ट्र भूषण’ घोषित केलं, आम्हांलाच आनंद झालाय! महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार! २००४ साली तुमच्या सोबत नाटकात काम करायचा बहुमान मला मिळाला होता. अनाधिकृतचे ते मंतरलेले ६ महिने मी कधीच विसरणार नाही!", असे हेमांगी कवीने म्हटले आहे.
हेमांगी कवीने केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार लाईक्स आणि कमेंट वर्षाव करताना दिसत आहे. तर अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याबरोबरच हेमांगीने सांगितलेल्या या आठवणीचेही अनेकांनी कौतुक केले आहे. दरम्यान अनधिकृत हे हेमांगी कवीचे पहिले नाटक होते. यात तिने अशोक सराफ यांच्याबरोबरच काम केले आहे. तिचे हे पहिलेच नाटक 2004 मध्ये रंगमंचावर आले होते आणि ते प्रचंड गाजले. या नाटकानंतर ती अभिनय क्षेत्रात सक्रीय झाली.