Jui gadkari Illness : मराठी मालिकाविश्वातील दमदार अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखले जाते. पुढचं पाऊल या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने कल्याणी हे पात्र साकारले होते. सध्या जुई ही ठरलं तर मग या मालिकेत झळकत आहे. यात तिच्या सायली या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी जुई गडकरी ही गंभीर आजाराशी झुंज देत होती. नुकतंच तिने याकाळात तिला आलेल्या अडचणी आणि त्यावर तिने केलेली मात याबद्दल भाष्य केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुई गडकरीने नुकतंच लोकमत फिल्मी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी तिला तिच्या आयुष्यात आलेला सर्वात कठीण कोणता, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर जुईने तिच्या आजारपणाबद्दल माहिती दिली. तसेच तिने यावर कशापद्धतीने मात केली यावरही भाष्य केले. 


"माझ्या कामावरही परिणाम झाला"


वयाच्या 27 व्या वर्षी मला डॉक्टरांनी सांगितलं की तू आई होऊ शकणार नाहीस. डॉक्टरांनी जेव्हा मला हे सांगितलं, तेव्हा मी एकटीच होते. त्यानंतर त्यांनी मला आईला बोलवून घ्यायला सांगितलं. तेव्हा मी पुढचं पाऊल या मालिकेत काम करत होती. या मालिकेत कल्याणीला मूलं होणार हा ट्रॅक सुरु होता. एकीकडे माझ्या खऱ्या आयुष्यात बाळ होणार नाही आणि दुसरीकडे ऑनस्क्रीन मला आईची भूमिका साकारायची, हे सर्व माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. माझे बरेच अवयव डॅमेज झाले होते. मला जेव्हा हे कळलं तेव्हा खूप त्रास झाला. त्यावेळी माझं बरंच कामही सुरु होतं. एवढ्या कमी वयात आपलं शरीर जेव्हा अशक्त होतं, तेव्हा आपण मानसिकदृष्ट्याही खचतो. या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या कामावरही परिणाम व्हायला लागला होता. माझे डान्स शोही कॅन्सल झाले, असे जुईने सांगितले. 


"7 वर्षांनी हा आजार कळला आणि..."


त्यापुढे ती म्हणाली, एक्स-रे एमआरआय केल्यानंतर समजलं की माझा मणका डिजनरेट झाला आहे. त्यावेळी डॉक्टर मला म्हणालेले की, तुझा मणका हा 60 वर्षांच्या माणसासारखा दिसतो. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता. ज्यामुळे मी आई होण्याची शक्यता कमी होत होती. थायरॉइड वाढला होता. व्हर्टिगोचा त्रास सुरु होता. मला आडवं होऊन झोपताच येत नव्हतं. अनेक रात्र, कितीतरी महिने मी बसून झोपायचे. नंतर डॉक्टरांनी ब्लड टेस्ट केल्यावर कळलं की RA+(rheumatoid arthritis) हा आजार झाला आहे.  


या आजारात तुमची इम्युन सिस्टिम शरीरातील चांगल्या टिश्यूंवर अटॅक करते. मला हा आजार 7 वर्षांनी कळला. त्यामुळे ज्यांना हा आजार आहे त्यांना मी विनंती करते की रोज उठून थोडे तरी सूर्यनमस्कार घाला. योगामुळे माझी शारीरिक क्षमता वाढली. रक्ताभिसरण सुधारलं. मी सलग 2-3 वर्ष या सर्व गोष्टींसाठी दिले. तुम्हाला प्रत्येक वेळेस जीममध्ये जाऊन वजन उचलण्याची गरज नाही. मी आहारात बदल केले. याबरोबरच अध्यात्मिकाचीही जोड हवी, असेही जुईने म्हटले. 


"भविष्यात मी जुळ्या मुलांची आईही होऊ शकते"


आपल्याकडे स्त्रीला मुलबाळ झाल्यावरच ती पूर्ण होते, असं मानलं जातं. पण, मग ज्या महिलांना मूल होऊ शकणार नाही. त्यांनी काय करायचं? ती स्त्री नाही का? तिच्यात मातृत्व नाही का? मलाही अजून लोक म्हणतात की पस्तीशी ओलांडली आता कधी लग्न करणार. पण, माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. परंतु यात माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. त्यामुळे मला याचा फरक पडत नाही. माझे रिपोर्ट आता पूर्वीपेक्षा चांगले येत आहेत. त्यामुळे भविष्यात मी जुळ्या मुलांची आईही होऊ शकते," असेही जुई यावेळी म्हणाली. 


दरम्यान जुई गडकरीने काही वर्षांपूर्वी याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. जुईने महिला दिनाच्या निमित्ताने तिला झालेल्या गंभीर आजाराबद्दल सांगितले होते. त्यात तिने तिच्या आजाराची सविस्तर माहितीही दिली होती. तसेच तिने याच कारणाने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतल्याचा खुलासाही केला होता. सध्या जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.