मुंबई : मालिका विश्वात आपल्या स्मितहास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री मयुरी देशमुख mayuri deshmukh हिनं फार कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मानत कायमचं स्थान मिळवलं. खुलता कळी खुलेना या मालिकेतील मयुरीच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे मालिकेला मिळालेलं यश, त्यानंतर खासगी आयुष्यात रमलेली मयुरी अशा एका वादळाला धडकली, ज्यामुळं तिचं पुरतं आयुष्य बदलून गेलं. पती, अभिनेता आशुतोष भाकरे यांच्या निधनानंतर मयुरीच्या जीवनात एक वेगळं वळण आलं. ज्यातून सावरत जवळपास चार महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर ती पुन्हा एका नव्या प्रवासाची सुरुवात करु पाहत आहे. 


ही सुरुवात खऱ्या अर्थानं खास आहे. कारण, मयुरी हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहे. गश्मीर महाजनी या अभिनेत्यासह ती या मालिकेत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'इमली' असं तिच्या आगामी मालिकेचं नाव आहे. ज्याची एक झलक खुद्द मयुरीनंच चाहत्यांच्या भेटीला आणली आहे. 


मालिकेचं कथानक हे खेडेगाव आणि शहर अशा दोन ठिकाणांमध्ये रमणाऱ्या पात्रांच्या आयुष्याभोवती आणि ज्यांच्या जीवनातील काही प्रसंगांभोवती फिरणार आहे. ज्यातून तीन प्रमुख पात्र कशा प्रकारे त्यांच्या जीवनातील प्रसंगांना सामोरे जातात आणि नेमकी ही कथा कशी उलगडत जाते हे पाहता येणार आहे. 


मालिकेचा प्रोमो पोस्ट करताना मयुरीनं त्यासोबत एक भावनिक कॅप्शनही लिहिलं... 


'सर्वच प्रियजनहो....


मी सावरण्यासाठी म्हणून तुम्ही पाठवलेल्या प्रत्येक विचाराचा इथं फायदा झाला. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमानं फरक प़डला. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबीयांनी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेसाठी मी कृतज्ञ आहे. तुमच्याकडून मिळालेल्या या प्रेमातचून मी उर्जा एकवटत आहे. एका नव्या विश्वात पाऊल ठेवत आहे. तुमच्या सदिच्छांची मला पुन्हा गरज आहे....'



चाहत्यांकडून आपल्याला यापुढंही अशीच साथ मिळावी म्हणून मयुरीनं केलेलं हे भावनिक आवाहन पाहून सर्वांनीच तिला या पुढील वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या.