`इतक्या घाणेरड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात...`, मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली `मंगळसूत्र घालावं का नाही...`
यासोबत तिने क्षिती जोगने मंगळसूत्राबद्दल मांडलेल्या मताबद्दल फेसबुकवर पोस्ट केली आहे.
Mugdha Godbole On Kshitee Jog Troll : मराठी कलाकार हे अनेकदा विविध विषयांवर रोखठोक मत मांडताना दिसतात. आता मराठी अभिनेत्री क्षिती जोगने मंगळसूत्र परिधान करण्याबद्दल एक विधान केले होते. यात तिने मंगळसूत्र घालावं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं म्हटले होते. त्यावरुन तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता यावर प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोलने संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
मुग्धा गोडबोले ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त करत असते. आता मुग्धाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने क्षिती जोगच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत तिने क्षिती जोगने मंगळसूत्राबद्दल मांडलेल्या मताबद्दल फेसबुकवर पोस्ट केली आहे.
मुग्धा गोडबोलेची पोस्ट
"हे रील नेहमीप्रमाणे मी instagram वर पोस्ट केलं. शनिवारी एपिसोड येणार, गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरु होतं. हा व्यवसायाचा भाग आहे. मुद्दा हा आहे की instagram वर ह्या रील खाली साधारण 300 च्या वर कॉमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या आहेत. त्या अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाघ्य आणि बीभत्स आहेत. आश्चर्य वाटावं का नको असाही आता प्रश्न पडतो. क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. आवडत नाही, चोरांची भीती वाटते वगैरे अनेक.
प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का? का नाही? इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो??? इतक्या घाणेरड्या comments करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील?? आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात, आता हे प्रश्न नाहीयेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की ते कॉमेंट्स वाचा. काळ बदलला आहे. विचार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत.कित्येक कॉमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत. कराव्या लागल्या", असे मुग्धा गोडबोलने म्हटले आहे.
दरम्यान मुग्धा गोडबोले ही अभिनेत्री-लेखिका आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘श्रीमंत घरची सून’ अशा गाजलेल्या मालिकांसाठी त्यांनी लेखिका म्हणून काम केलं आहे. उत्तम लिखाणाप्रमाणे त्या दमदार अभिनयही करतात.