Prajakta Mali Instagram Post : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ताच्या अभिनयासह तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मालिकांमुळे प्राजक्ता ही घराघरात पोहोचली. आता प्राजक्ताने एका बालिकाश्रमाला भेट दिली आहे. तिने याचा अनुभव सांगितला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कै. बयाबाई वा. ठाकूर निराधार बालिकाश्रमाला भेट दिल्याची माहिती दिली आहे. या आश्रमातील मुलींचा एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने तिचा अनुभव सांगितला आहे.                                 


प्राजक्ता माळीने सांगितला अनुभव


"२ दिवसांपूर्वी Netflix वर “भक्षक” सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी ह्या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला… कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींग मध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून ह्या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं. सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील ह्या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे. (राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत. - नियम व अटी लागू.) ह्या बालिकाश्रमासाठी भाई ठाकूर व परिवाराचे आभार.  (भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.)", असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे. 



प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या या कामाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. यात अनेकांनी "खूप छान प्राजू, तू खरचं ग्रेट आहेस", असे म्हटले आहे. तर "काहींनी फार सुंदर काम, आम्हाला तुझा अभिमान वाटतो", अशी कमेंट केली आहे.  दरम्यान 'भक्षक' हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात भूमी पेडणेकर, आदित्य श्रीवास्तव, सई ताम्हणकर, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.