मुंबई : चित्रपट किंवा मालिकांच्या ट्रेंडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कला आणि मनोरंजन विश्वात आणखी एक प्रकार चांगलाच स्थिरावला. स्थिरावला म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांची या प्रकाराला चांगलीच पसंती मिळाली. अशा या मनोरंजनाचा नवा प्रकार म्हणजे वेब सीरिज. अफलातून कथानक, चौकटीबाहेरच्या संकल्पना आणि पट्टीचे कलाकार अशी एकंदर घडी बसवत आजवर अनेक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. प्रभावी आणि तितक्याच थेट संवादांपासून या वेब सीरिजचा आणखी एक महत्त्वाचा भाग ठरला तो म्हणजे छायांकन आणि अमुक एका वेब सीरिजमधील दृश्यं. कथानकाला अनुसरून त्या अनुषंगानेच चित्रीत केल्या जाणाऱ्या दृश्यांमुळेच काही वेब सीरिज खऱ्या अर्थाने गाजल्या, चर्चेत आल्या. सध्या चर्चा सुरु आहे ती अशाच एका वेब सीरिजची. अभिनेत्री प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी यांच्या या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका दिसत असून नागेश कुकुनूर याने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणाची पार्श्वभूमी घेत कौटुंबीक कलह, मतभेद, नातेसंबंध या आणि प्रत्येक क्षणाला बदलणारी जीवनशैली या साऱ्या गोष्टींची घडी बसवत ही वेब सीरिज साकारण्यात आली. संमिश्र प्रतिसाद मिळवणारी ही सीरिज चर्चेत आली ती म्हणजे एका वेगळ्यात कारणामुळे. मराठी चित्रपट, मालिका विश्वातून वेब जगतात पदार्पण करणाऱ्या प्रिया बापट हिच्या भूमिकेचं प्रेक्षकांना कुतूहलही लागून राहिलं होतं. पण, याच वेब सीरिजधील प्रियाचं एक बोल्ड दृश्य व्हायरल झालं. ज्यामध्ये ती आणि अभिनेत्री गितीका त्यागी एकमेकींसोबत चुंबनदृश्य देताना दिसत आहेत. 





सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनाही चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. कोणी थेट शब्दांमध्ये प्रियाचं हे दृश्य पाहता या अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं म्हटलं तर कोणी या संपूर्ण वेब सीरिजविषयीच नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या या दृश्याविषयी माध्यमांशी संवाद साधतेवेळी प्रियाने वेब सीरिज पाहिल्यानंतर त्या दृश्याचं महत्त्वं लक्षात येईल अशा प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. 






एकिकडे काही नेटकऱ्यांनी प्रियाच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या असल्या तरीही तिच्या याच दृश्याची प्रशंसा करणाऱ्यांचीही संख्या कमी नव्हती. समलैंगिक संबंधांकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचा मुद्दा या प्रतिक्रियांमधून प्रकर्षाने मांडण्यात आला. तर, काहींनी उपरोधिक ट्विट करत संकुचित विचारसरणीवर निशाणा साधला.