Ruchira Jadhav Buy New House : गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार हे वैयक्तिक आयुष्यात भरारी घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ चांदेकर, ऋता दुर्गुळे, प्रसाद ओक, अमित भानुशाली, अश्विनी महांगडे, पृथ्वीक प्रताप या कलाकारांनी नवीन घर खरेदी केले आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. मराठी मालिकांमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या एका अभिनेत्रीने नवीन घर घेतले आहे. तिने स्वत: याबद्दलची गुडन्यूज दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत अभिनेत्री रुचिरा जाधवने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने तिच्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या घराच्या नेमप्लेटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 


रुचिरा जाधवची पोस्ट


रुचिरा जाधवने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर खरेदी केले आहे. रुचिराने या पोस्टला कॅप्शन देताना स्वप्नपूर्ती झाल्याचे म्हटले आहे. "घर म्हणजे जिथे आनंद असतो, घर म्हणजे जिथं माझी माणसं हसतात, घर म्हणजे एक अशी वास्तू जिथे तुम्ही हे सर्व साध्य करु शकता. आयुष्यात फार कमी गोष्टी आहेत ज्यामुळे मला आनंद आणि समाधान मिळतं. माझं काम आणि माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे हसू या गोष्टी त्यापैकीच एक आहेत. स्वप्न पूर्ण करण्याच्या माझ्या प्रवासात मला जाणवलं की स्वत:चं घर हे त्यापैकीच एक आहे. आमच्यासाठी गुढीपाडवा हा असा होता, असे रुचिराने म्हटले आहे. 



घराची झलक


त्यासोबतच रुचिराने तिच्या घराची खास झलकही दाखवली आहे. यात रुचिरा, तिची आई, वडील आणि बहिण दिसत आहे. त्यासोबतच रुचिराने घरातील किचन, दारावरील नेमप्लेट, बेडरुम याची झलकही दाखवली आहे. या फोटोंना कॅप्शन देताना तिने "ही शेवटची स्टेप नाही...पण, पहिली नक्कीच आहे. प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे," असं तिने म्हटले आहे. 



दरम्यान रुचिरा ही सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत झळकत आहे. यापूर्वी ती तिने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभागी झाली होती. रुचिरा जाधवने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत ती नुपूरच्या भूमिकेत दिसली. ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही ती झळकली. मालिकांशिवाय रुचिरानं नाटक आणि चित्रपटातही काम केलं आहे.