मुंबई : अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' य़ा चित्रपटातून सलमानच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली. त्यासोबतच चित्रपटात आणखी एक भूमिका विशेष गाजली. ती भूमिका म्हणजे सलमानच्या आईची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने चित्रपटात सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. पण, सलमानहून वयाने जवळपास दहा वर्षे लहान असणाऱ्या सोनालीची या मुद्द्यावरुन खिल्ली उडवण्यात आली. तिच्या भूमिकेवर काहींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. याचविषयी सोनालीने तिची बाजू मांडली आहे. 


'एचटी कॅफे'शी संवाद साधतनाता सोनालीने याविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या. 'माझ्या भूमिकांची निवड मी स्वत: केलेली असते. त्यामुळे निवड कोणतीही असो, ती मी स्वत:च केल्यामुळे त्यावर मोठ्या गर्वाने ठाम राहणंच अतीव महत्त्वाचं. सध्या प्रेक्षक आणि समीक्षकांचा प्रतिसाद पाहून मी भावूक झाले आहे', असं ती म्हणाली. 


आपण 'मिशन काश्मीर' (२०००) चित्रपटातही हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती, असं सांगत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे कारण ते अनेकदा योग्य त्याच प्रतिक्रिया देत असल्याचा मुद्दा तिने मांडला. पण, या प्रतिक्रियांकडे नेहमीच नकारात्मकपणे किंवा टीकेच्याच नजरेतून पाहिलं जाऊ नये हा विचारही तिने मांडला. अनेकदा प्रेक्षक काळजीपोटीही व्यक्त होतात हे तिने यावेळी स्पष्ट केलं. 


मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच हिंदी कलाविश्वानेही आपल्याला बहुविध भूमिका साकारण्याची संधी दिल्याचं सांगत सोनालीने याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. भारत या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानसोबत स्क्रीन शेअर करण्याचा आनंदही तिने व्यक्त केला. मुळात त्याच्याविषयी सोनालीने फार गोष्टी ऐकल्या होत्या. पण, या एकीव गोष्टींपेक्षा एक वेगळा सलमान तिला पाहायला मिळाला होता. एक मोठा कलाकार असूनही कुठेच त्या गोष्टीचा गर्व न करता तो चित्रपटाच्या सेटवर वावरत असे, असं तिने सांगितलं.