मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्यासाठी यंदाचा नवरात्रोत्सव खास ठरला. इथे खास म्हणण्यामागचं कारण की, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तेजस्विनी स्वत:सुद्धा देवीच्या रुपात सर्वांसमोर आली होती. प्रत्येक फोटोमध्ये देवीचं एक रुप आणि त्या रुपासोबत तिने मांडलेल्या व्यथा, काही महत्त्वाचे प्रश्नही सर्वांचं लक्ष वेधून गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचं फोटोशूट करण्याचा एक नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनीने सुरू केला. अशा या हटके ट्रेंडचं हे तिसरं वर्ष आहे.


आपल्या याच फोटोशूटविषयी ती म्हणते, “पहिल्या वर्षी फोटोशूट करताना आपण असा काही ट्रेंड सुरू करावा. असं मनात नव्हतं. पण, बऱ्याच कालावधीपासून मनात असलेली खदखद मांडावी, इतकंच ठरवलं होतं. त्यावेळी मनाला भिडलेल्या सामाजिक प्रश्नांवर एक फोटोशूट केलं. दुसऱ्या वर्षी प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या नऊ देवींच महात्म्य फोटोशूटव्दारे मांडलं. तर यंदा तिसऱ्या वर्षी एक नागरिक म्हणून भेडसावणाऱ्या काही सामाजिक मुद्द्यावर आपल्या पध्दतीने भाष्य करावं, असं वाटलं.”


तेजस्विनी म्हणते, “ब-याचदा कलाकार हा टिकेचा धनी ठरतो. आम्ही मत नाही मांडलं तरीही टिका होते. मत मांडलं तरीही आम्ही आजकाल ट्रोल होतो. पण फोटोशूट व्दारे जेव्हा मी काही मुद्दे मांडले तेव्हा माझ्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला'', याचा मात्र आनंद आहे. 


तेजस्विनीने असे फोटोशूट केल्यावर अनेक अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनीही असे फोटोशूट करायला सुरूवात केली. त्यामुळे ती नवरात्री फोटोशूटमध्ये ट्रेंडसेटरच ठरली. याच ट्रेंडविषयी सांगत ती म्हणते, “नवरात्रोत्सव म्हणजे फक्त नऊ रंगाच्या कपड्यांमध्ये फोटो न काढता आता अनेकजणं कल्पकतेने काही नवं करतायत, ह्याचा आनंद आहे. अनेक लोकं मला सोशल मीडियावरून टॅगही करत आहेत. अशावेळी खूप छान वाटतं.”


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोशूटसाठी तेजस्विनी न विसरता साऱ्या टीमला आणि या रुपासाठी मेनत घेणाऱ्या प्रत्येकाचे न विसरता आभार मानते. तिचं हे फोटोशूट पाहिल्यावर त्यामागे असलेल्या मेहनतीबद्दल विचारताच ती म्हणते, “माझ्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचं आणि कल्पकतेचं हे फलित आहे. प्रत्येक फोटोसाठी मला मेकअप करून तयार व्हायलाच सूमारे तीन तास लागायचे. त्यानंतर फोटो काढून त्यावर व्हीएफएक्ससाठी पुढचा अडीच दिवस लागायचा. असे आम्ही नऊ फोटोशूट केले. ही प्रक्रिया खूप रंजक होती.” अनेक तासांची मेहनत, खरेपणा आणि एकंदरच त्यामागे असणारी समर्पक वृत्ती या साऱ्याच गोष्टी तिच्या प्रत्येक फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.