'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदार ही कायमच चर्चेत असते. या कार्यक्रमामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. विशाखाने विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकतंच विशाखाचे घर सांभाळणाऱ्या मावशींनी २ बीएचएके घर खरेदी केलं आहे. याबद्दल शेअर केलेल्या पोस्टवरुन त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता त्यांनी यावर उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाखा सुभेदार या इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतात. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोद्वारे विशाखाने तिचे घर सांभाळणाऱ्या ताईंनी घर खरेदी केल्याची गुडन्यूज दिली होती. यासोबतच विशाखाने तिला केलेल्या मदतीबद्दलही भाष्य केले. पण यावरुन एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 


विशाखा सुभेदारचे चाहत्याला उत्तर


यावर एकाने कमेंट केली आहे. "केलेली मदत सांगून नाही दाखवायची असे मला तरी वाटते....पण ती केलेली मदत व्यक्त करू शकते....माझे मत आहे..चुकले असेल तर क्षमस्व. पुढील मदतीसाठी शुभेच्छा", असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यावर विशाखाने सडेतोड उत्तर दिले आहे. "ही मदत नव्हेच, माझ्या कुटुंबातील सदस्य तिची मेहेनत आणि त्यावरचा माझा आनंद ही post आहे, कुठेही मदत हा शब्द नाहीये.. साथीदार आणि साक्षीदार असे शब्द आहेत.. अचिएव्हमेन्ट ची post आहे." असे विशाखा सुभेदारने प्रतिक्रिया देताना म्हटले.


त्यावर त्या नेटकऱ्याने "क्षमस्व:मी माझी पोस्ट काढून टाकतो...माफी असावी", असे म्हटले आहे. विशाखा सुभेदारची ही कमेंट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर तिचे अनेक चाहते तिला पाठिंबा देताना दिसत आहे.



विशाखा सुभेदारने पोस्टमध्ये काय म्हटलंय?


"आज सकाळी माझ्या अंबरनाथ घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा "शोभा "तिचा फोन आला.. ताई good news आहे, (मला वाटलं पोराचा लग्नाची तारीख काढली असावी..!) मी म्हटलं "काय गं??" तर म्हणली ताई... घर book केल 2 bhk.. खुप आनंद, उत्साहात सांगत होती.. मलाही खुप आनंद झाला.. अंबरनाथ west ला थोडं स्लम एरिया मध्ये रहाणारी, चौदा वर्षपूर्वी शोभा माझयाकडे जवळ जवळ रोज 40 मिनिट चालत कामाला यायची, तिची धावपळ आणि पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घरा जवळ मी भाडयाने घर घेऊन दिल, तर वाचलेल्या वेळेत तीने अजून एक ठिकाणी काम धरलं, पोरं मोठी झाली, शिक्षण झाली...


एकदा फ्रीज घायचा म्हणाली पगारातून एक हजार कापा, तुम्ही घेऊन दया फ्रिज.. आणी तीने फेडले पैसे.. धाडसी बाई..! तिच्या मुलांनी सुद्धा खुप कष्ट केले...10/12 वी नंतर कुठे कुठे छोटयामोठ्या नोकऱ्या केल्या, घराला हातभार लावला, मग मोठा मुलगा उत्तम पगाराने कामाला लागला.. पुन्हा शोभा चा फोन.. ताई शुभम ला इतक्याइतक्या पगाराची नोकरीं लागली...! पुन्हा फोन ताई लग्न ठरलं...! पुन्हा फोन..धाकटी पोर पास झाली..! तिची तिची अनेक शिखर तीने ओलांडली.. आज तिचा प्रवास पहिला कीं मलाच खुप समाधान मिळत .! तिच्या सगळ्या प्रवासाची मी साथीदार व साक्षीदार आहे..! माझ्या कडे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली कीं कोण कौतुक वाटत मला...! मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर..! 


माझ्याकडे स्पॉटबॉय म्हणून आलेला" शिवा" त्याला मी क्लासला लावले, ड्रायविंग शिकवलं आणि त्याचा ड्राइव्हर झाल्यावर,त्याला उत्तम पगाराची नोकरीं सुद्धा लागली.. अर्थात त्याचे कष्ट आहेतच, पण मी फक्त एक मार्ग झाले ह्याचा मला आंनद होतों कायमच..! परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्या कडून ते करवून घेतलं हे त्या ईश्वराचे आभार..माझ्या शोभाचे खुप कौतुक", अशी पोस्ट विशाखा सुभेदारने केली होती.