Urmila Nimbalkar You Tube Channel : कलाजगताशी असणारं नातं जपत मागील काही वर्षांपासून युट्यूब क्षेत्रामध्ये मराठी (Lifestyle Content) लाईफस्टाईल कंटेंट क्रिएटर अशी ओळख बनवू पाहणाऱ्या अभिनेत्री उर्मिला निंबाळकरविषयी आता नवं काही सांगायला नको. कलाजगतापासून उर्मिला सध्या काही अंशी दूर असली तरीही तिनं कलेशी असणारं नातं तोडलेलं नाही. किंबहुना ते तुटणारही नाही. सध्या हीच उर्मिता युट्यूबवरून कलेच्या एका नव्या रुपात चाहत्यांच्या समोर येते. साडी नेसण्यापासून ते गरदोरपणानंतर महिलांनी नेमकी कशी काळजी घ्यायची इथपर्यंतच्या असंख्य गोष्टींवर ती खुलेपणानं बोलते. अशा या उर्मिलानं नुकताच युट्यूबर एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ज्यापूर्वी तिनं फॉलोअर्सशी संवाद साधला. (Urmila Nimbalkar videos)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला विचारण्यात आलेल्या असंख्य प्रश्नांची तिनं पटण्याजोगी उत्तरं दिली. तिला विचारण्यात आलेल्या या प्रश्नांमधून समाजाची मानसिकता नेमकी कुठे झुकतेय याचाही प्रत्यय आला. आपल्याला विचारण्यात आलेल्या काही प्रश्न उर्मिलालाही भावले. तर, काही प्रश्नांमुळं तिच्या तळपायाची आग मस्तकात केली. 


जेवणापासून, नैसर्गिकरित्या गरोदर राहिलीस का? इथपर्यंतचे प्रश्न 


युट्यूबचा प्रवास, पतीसोबतचं नातं, बाळाची माहिती या अशा प्रश्नांसोबतच अनेक प्रश्नांची उत्तरं उर्मिलानं एका नव्या व्हिडीओमध्ये दिली. त्यादरम्यानच तिला एक काहीसा बोचरा प्रश्नही विचारला गेला. 'स्वयंपाक येतो का तुला?' या प्रश्नाचं उत्तर देताना, 'प्रगती कितीही केलेली असली तरीही स्वयंपाक येतो का तुला असाच प्रश्न अखेर विचारला जातो' याच शब्दांत उत्तराला सुरुवात केली. 


'स्त्री ची संपूर्ण लायकीच तिला स्वयंपाक येतो का यावर का ठरवली जाते. मुळात स्वयंपाक येणं ही एक कला असून, काहींकडे ती असते, तर काहींकडे ती नसते. त्याच्यामुळं आपण कोणाबद्दल पूर्वग्रह बांधू नये. माझ्याकडे लाईफस्कील्स आहेत', असं म्हणताना कधी वेळ आली तर बनवता येतो असं सांगत आपण उत्तम स्वयंपाक करत असल्याचं तिनं स्पष्ट केलं. 


लग्नानंतरच्या Sexual Life बद्दल बोलताना उर्मिलानं उत्तर देत बरेच बदल झाल्याचं म्हटलं. इथं तिनं हा फॅमिली चॅनल असल्यामुळं बरीच लहान मुलंही तो पाहत असल्याचं सांगत हे उत्तर आवरतं घेतलं. पण या बाबतीत गायनॅकोलोजिस्टना भेटा, विचार करा असा सल्ला जोडप्यांना दिला. 



हेसुद्धा वाचा : 'किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा...', अन् सुव्रत जोशीने मारला किड्यांवर ताव; पाहा व्हिडीओ


प्रश्नांच्या या रांगेत तिला 'बाळ नॅचरली कन्सिव्ह केलंय का?' अशा आशयाचा प्रश्न विचारला गेला आणि इथंच उर्मिलाचा पारा चढला. या प्रश्नाचं उत्तर तिनं होकारार्थी दिलं असलं तरीही अशा प्रश्नांनी भयंकर राग येतो असंही ती म्हणाली.'कोणी कसंही गरोदर राहो, काय फरक पडतो. जर या विज्ञानाचा उपयोगच काय फायदा?' असा प्रश्न उपस्थित करताना उर्मिलानं बाळ बाळ असतं आणि आई ही आई असते. सरतेशेवटी बाळ आणि आई सुखरुप आणि निरोगी असणं हेच महत्त्वाचं असा विचारही सर्वांपुढे ठेवला. 


नकारात्मकतेत स्वत:शी बोलते.... 


बऱ्याचदा कामाचा ताण, एकंदर परिस्थिती आणि अनेक इतर कारणांमुळे आपल्याला विचित्रपणा ग्रासतो. नकारात्मकता वाढते. अशा परिस्थितीत मी स्वत:शी बोलते, असं केल्यानं अनेकदा बऱ्याच गोष्टी समजतात, समस्या कळतात आणि प्रश्नांची उत्तरंही मिळतात, असा सोपा मार्ग तिनं इतरांनाही सुचवला. याचवेळी सोशल मीडिया ट्रोलर्सना कशी सामोरी जातेस या प्रश्नावर, 'ट्रोलर्सकडे अजिबात लक्ष देत नाही. आपण सर्वांनाच आवडू शकत नाही त्यामुळं त्यांना शक्यतो टाळतेच त्यात डिलीट आणि ब्लॉक हे उत्तम पर्याय आहेत' असं ती स्पष्टपणे म्हणाली.