पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी `नाम`कडून होतेय अशी मदत
`नाम फाऊंडेशन`तर्फे इतरांनाही मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुरामुळे हाहाकार माजलेला असतानाच आता अनेक मदतीचे हात या पूरग्रस्तांच्या आधारासाठी पुढे सरसावत आहेत. विविध क्षेत्रांतूनही अनेक प्रकारे पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. मराठी कलाविश्वही यात मागे राहिलेलं नाही.
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या 'नाम' फाऊंडेशनतर्फे कोल्हापूर, सांगली आणि पूरामुळे प्रभावित इतर ठिकाणी मदत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू या संस्थेतर्फे ट्रकमधून पाठवण्यात आल्या आहेत.
संकटात सापडलेल्या पुरग्रस्तांसाठी तरुणांनी एकत्र येत खाण्याच्या पदार्थांसह धान्य, ब्लॅंकेट्स आदी वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद केंद्रावर विविध नागरिकांनी स्वत:हून अनेक वस्तू आणून देत मदतीमध्ये आपलंही योगदान दिलं.
पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे आता ही आपली जबाबदारी आहे, की मदत करावी तरी कशी. असं म्हणत आर्थिक पद्धतीने मदत करण्यासोबत ब्लँकेट किंवा इतरही कोणत्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन नाना पाटेकर यांनी केलं. तर, पूरग्रस्तांना आता दैनंदिन आयुष्य़ाचा गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी विविध गोष्टींसाठी आर्थिक पाठबळाचीही गरज लागणार आहे, ही वस्तुस्थिती समोर ठेवत जितकी शक्य होईल तितकी मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन अभिनेता मकरंद अनासपुरे याने केलं.