मुंबई : मराठी मालिका विश्वाला लोकप्रिय मालिका देणारे दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी (Mandar Devsthali) सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. याला कारण म्हणजे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmistha Raut) आणि अभिनेता संग्राम समेळने (Sangram Samel) यांच्यावर केलेले आरोप. या दोन कलाकारांनी मंदार देवस्थळींवर पैसे थकवल्याचे आरोप केले आहे. आपल्या मेहनतीचे पैसे देखील भीक मागितल्यासारखे मागावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्मिष्ठा राऊत आणि संग्राम समेळ यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सारखीच पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की,'काम करूनही त्याचा पैसा वेळेवर मिळत नाही. निर्मात्याकडून अनेक कारणं देऊन मेहनतीचा पैसा लांबवला जातो. आपल्या मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भीक मागितल्या सारखा सतत मागत राहणे हे योग्य आहे का?' असा सवाल यामध्ये विचारण्यात आला आहे. 



संग्राम समेळसोबत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने देखील सेम पोस्ट शेअर केली आहे. शर्मिष्ठा राऊत हिने सोशल मीडियावर सर्वात प्रथम पोस्ट करुन हे प्रकरण सर्वांसमोर आणले आहे. शर्मिष्ठा सध्या कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करत होती. ही मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. यानंतर अभिनेत्री शर्मिष्ठासह मालिकेतील अनेक कलाकारांनी याबद्दल आपला रोष व्यक्त केला आहे.


शर्मिष्ठासोबतच ‘हे मन बावरे’ या मालिकेतील मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही सोशल मीडियावर शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे. यावर निर्माता आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी पोस्ट करून आपली बाजू मांडली आहे. 



मंदार देवस्थळी यांनी कलाकारांना आपली सद्याची स्थिती सांगितली आहे. सद्या मी आर्थिक बिकट परिस्थितीला सामोरं जातं आहे. यामुळे आता माझी पैसे देण्याची परिस्थिती नाही. तुमचे पैसे मी टॅक्स सकट परत करेन, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.