REVIEW : एका गच्चीची कहाणी
खरंतर `गच्ची` ही प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणासाठी खास असते, कायम वेग वेगळ्या आठवणी, वेगळे किस्से ही गच्ची सांगत असते. `गच्ची`, या सिनेमातील गच्चीही एक हटके गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतेय.
जयंती वाघदरे, झी मीडिया, मुंबई : खरंतर 'गच्ची' ही प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणासाठी खास असते, कायम वेग वेगळ्या आठवणी, वेगळे किस्से ही गच्ची सांगत असते. 'गच्ची', या सिनेमातील गच्चीही एक हटके गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतेय.
कलाकार
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका असलेला गच्ची या विकेन्डला आपल्या भेटीला आलाय. नचिकेत सामंत दिग्दर्शित गच्ची या सिनेमाची कथा किर्ती आणि श्रीराम या दोन व्यक्तिरेखांची आहे. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सिनेमा एका गच्चीत शूट करण्यात आलाय.
असा आहे हा सिनेमा
नेहमी सरळ मार्गानं चालणा-या श्रीरामची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता अभय महाजननं तर याच व्यक्तिरेखेच्या अगदी कॉन्ट्रास्ट भूमिका अर्थातच किर्ती या व्यक्तिरेखेत दिसतेय अभिनेत्री प्रिया बापट. किर्ती आयुष्याला कंटाळून गच्चीवरुन जीव द्यायला निघतेय, तेवढ्यात अभयची नजर तिच्यावर पडते. तिचा जीव वाचवण्यासाठी तो गच्चीवर पोहोचतो. आपल्या गोष्टीत लूडबूड करत असल्यामुळे किर्ती त्याच्यावर चिडते आणि त्याला निघून जायला सांगते.. याच दरम्यान या दोघांमध्ये अनेक गोष्टी घडतात, ज्या खूपच मजेशीर पद्धतीनं दिग्दर्शक नचिकेत सामंतनं रंगवण्याचा प्रयत्न केलाय.
पूर्वाध चांगला मात्र...
गच्ची या सिनेमाचा पूर्वाध चांगला झालाय. इंटरव्हलनंतर मात्र सिनेमाची पकड जरा अडखळते.. कथा चांगली असली तरी पटकथा खटकते. जवळपास 90 टक्के सिनेमा गच्चीवर चित्रीत झालाय, त्यामुळे सिनेमाचं सादरीकरण, गोष्ट आणि मांडणी या तिन्ही गोष्टींमध्ये नाविन्य दिसतं. गच्ची सिनेमाचं संगीत छान आहे, मात्र बॅकग्राउंड स्कोर अनेक ठिकाणी गरजेपेक्षा लाऊड वाटतो.
अभय महाजन पहिल्यांदाच लीड रोलमध्ये
अभिनेता अभय महाजन या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा लीड रोलमध्ये दिसतोय. या आधी त्यानं रंगा पतंगा आणि रिंगण या सिनेमात छोट्या पण महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. अभयनं गच्ची सिनेमातली त्याची व्यक्तिरेखा चोख पार पाडली आहे. अभिनेत्री प्रिया बापट आणि अभय महाजन या दोघांमधली कॅमिस्ट्री सिनेमात छान रंगली आहे.
किती स्टार्स
गच्ची हा पूर्णपणे मसाला सिनेमा नसला तरी हा सिनेमा पाहण्याची वेगळी मजा आहे. या सगळ्या गोष्टी पाहता गच्ची या सिनेमाला मिळतायत 3 स्टार्स..