`टायगर...`ला टक्कर द्यायला येतोय `चरणदास चोर`!
येत्या २२ डिसेंबर रोजी सलमान खान स्टारर `टायगर जिंदा है` हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होतोय... महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी एक मराठी सिनेमाही प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे... हा सिनेमा `टायगर जिंदा है`ला टक्कर देऊ शकेल का? हेही लवकरच कळेल...
मुंबई : येत्या २२ डिसेंबर रोजी सलमान खान स्टारर 'टायगर जिंदा है' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होतोय... महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी एक मराठी सिनेमाही प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे... हा सिनेमा 'टायगर जिंदा है'ला टक्कर देऊ शकेल का? हेही लवकरच कळेल...
एखादा मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होत असेल तर त्या आठवड्यात एकही मराठी सिनेमा प्रदर्शित होत नाही. कारण, अपेक्षित थिएटर्स आणि वेळा मिळत नाहीत. आणि जेव्हा केव्हा एखादा सोयीचा आठवडा मिळतो, तेव्हा एक-दोन नव्हे तर चक्क पाच-सहा मराठी चित्रपट एकत्र प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आशयघन आणि उत्तम सादरीकरण असुनही मराठी चित्रपटाला प्रेक्षक लाभत नाहीत. हिंदी समोर मराठी प्रेक्षकांसाठी उत्तम मराठी चित्रपटाचा पर्याय उभा करण्यापेक्षा आपआपसात भिडण्यात मराठी चित्रपटाचे निर्माते धन्यता मानत आहेत. शेवटी प्रेक्षक कुणाच्याच वाट्याला येत नाहीत आणि तिकीट बारीवर चित्रपट सपशेल आपटतो. यावर गांभिर्याने विचार करून युनीट प्रोडक्शन 'चरणदास चोर' हा त्यांचा आगामी सिनेमा सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ समोर प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहे.
२२ डिसेंबर रोजी चरणदास चोर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. एकाच आशयाचे एका मागोमाग एक येणारे तेच ते सिनेमे पाहण्यापेक्षा चरणदास चोर हा मार्मिक विनोदी चित्रपट मराठी प्रेक्षकांसमोर उत्तम पर्याय ठरणार आहे. ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जीं सारख्या महान चित्रकर्मींच्या मार्मिक पण सहज विनोदाच्या शैलीचा प्रभाव असलेला 'चरणदास चोर' या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
श्याम महेश्वरी यांचे लेखन-दिग्दर्शन आणि संजू होलमुखे यांचे क्रिएटीव्ह दिग्दर्शन असलेला 'चरणदास चोर' या चित्रपटाचा पहिलाच पोस्टर फार गमतीदार आहे. चित्रपटाचे नाव जरी चरणदास चोर असले तरी पोस्टरवर मात्र चोर दिसत नाही. त्याऐवजी एक पत्र्याची सुंदर रंगवलेली ट्रंक रेल्वेच्या रुळावर ठेवलेली दिसते आहे. त्यामुळे चित्रपटातील हो चोर नक्की कोण? याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
पोस्टरवर नमूद केलेल्या संत कबिरांचा दोह्यामुळे चित्रपटाचा गाभा स्पष्ट होतो. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीनच वाढली आहे.