`आई भवानीला समधीकडं पोहोचता येत न्हाय म्हणून तर तिनं आई बनवली`
स्वराज्य राखायचं असेल, तर सावधान...
मुंबई : सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'हिरकणी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शालेय दिवसांमध्ये वाचलेला एक धडा जणू प्रेक्षकांसमोर उभा राहत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'हिरकणी'चं लहानसं कुटुंब, शिवकालीन काळ या साऱ्याची झलक पाहायला मिळत आहे.
गडावर वाजणाऱ्या तोफेशी तिचं असणारं वैर हे काही ट्रेलरमधूनही लपून राहिलेलं नाही. बाळाला धडकी भरवणारी हीच तोफ आई आणि तिच्या बाळाच्या नात्यात तशा प्रकारे एक वळण आणते त्याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आल्याची झलक पाहता येत आहे. गडावर दूध पोहोचवण्यासाठी गेलेली हिरकणी कशा प्रकारे तिथून निघण्यासाठी जीव धोक्यात घालून अशक्य कडा उतरण्याचा निर्णय घेते, या थराराचं दर्शन ट्रेलरमधून पाहता येत आहे.
महाराजांच्या गडावर नेमकं कसं वातावरण असतं, एखाद्या खास दिवशी कशी माणांसांची ये-जा असते इथपासून महाराजांच्या महाली रयतेलाही कशा प्रकारे आपलेपणाची वागणूक दिली जाते, हे ट्रेलर पाहताना लक्षात येत आहे, अतिशय सुरेख अशा या ट्रेलरमध्ये कडा उतरणारी 'हिरकणी' पाहताना या मातेच्या साहसाची दाद द्यावी तितकी कमीच अशी भावना मनात घर करुन जात आहे. फक्त मराठी चाहते आणि कलाकारत नव्हे, तर हिंदी कलाविश्वातही 'हिरकणी'विषयीची उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळत आहे.
प्रसाद ओकच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेली ही गाथा चिन्मय मांडलेकरच्या लेखणीतून साकारण्यात आली आहे. असा हा चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने एका वेगळ्या काळात नेणारी आणि एका नव्या साहसाला जवळून पाहण्याची संधी देणार असंच म्हणावं लागेल.