`लगन` सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
एक नवी कोरी जोडी रसिकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : 'तुम्हाला वाटतंय पण सोपं नाही' अशी टॅगलाईन असलेला 'लगन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाव्दारे एक नवी कोरी जोडी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी चित्रपटाचं शीर्षक 'लगन' असं आहे. 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे.
या सिनेमाची निर्मिती जी. बी. एन्टरटेन्मेंटनं लगन' च्या माध्यमातून केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात प्रेमाचे नवे रंग,आणि नवी परिभाषा रसिकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. त्यामुळे 'लगन' म्हणजे नेमकं काय? याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगड्या चित्रपटात एक नवी कोरी जोडी रसिकांच्या भेटीला येणार असली तरी तूर्तास सर्वच कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत. डीओपी सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांनी चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी. शंकरम यांनी गायलेल्या गीतांना संगीतकार पी. शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांनी संगीतसाज चढवला आहे. पी. शंकरम यांनीच पार्श्वसंगीतही दिलं असून, विकास खंदारे यांनी साऊंड डिझाईन केलं आहे.