मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर यांची अजरामर साहित्यकृती असलेला 'माचीवरला बुधा' सिनेमाच्या स्वरुपात लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गो. नी. दांडेकर यांच्या 'जैत रे जैत' आणि पवनाकाठचा 'धोंडी' या कादंबऱ्यावर चित्रपट आले आणि गाजले. परंतु 'माचीवरला बुधा' या कादंबरीवर गेल्या ६० वर्षात इच्छा असूनही कुण चित्रपट निर्मिती करू शकले नाही. कारण, 'माचीवरला बुधा' हे एक शिवधनुष्य होते. महाराष्ट्राचे कोकण महाद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सुमारे २५०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या राजमाची गडावर चित्रीकरण करणे किंवा त्यासारखे दुसरे स्थळ मिळणे हे महाकठीण काम होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी, छत्रपती शाहू महाराज आदिंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजमाचीवर जाऊन सिनेमा पूर्ण करण्याचे दिग्दर्शक विजयदत्त आणि गोनिदांची कन्या डॉ. वीणा देव यांचे स्वप्न निर्मात्या दीपिका विजयदत्त यांनी सत्यात उतरवले आहे.


'माचीवरला बुधा हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपवायचे असेल तर ते बुधासारखे... असे ते नेहमी म्हणत! खरंतर बुधा ही व्यक्तिरेखा म्हणजे आप्पा स्वत:च होते. पटकथा वाचल्यानंतर माझा पूर्ण विश्वास बसला की दिग्दर्शक विजयदत्त यांना बुधा गवसला आणि सुहास पळशीकर यांनी बुधा खऱ्या अर्थाने उभा केला आहे. याचा मला आनंद आहे' अशा शब्दांत 'माचीवरला बुधा' या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात डॉ. वीणा देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा चित्रपट येत्या शुक्रवारी १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे.


मुंबईच्या धकाधकीतले नकोसे झालेल्या जगण्याचा त्याग करून राजमाची गडावर निवांतपणे निसर्गाच्या कुशीत स्वतःला विलीन करणाऱ्या बुधा या नायकाची भूमिका ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांनी साकारली असून स्मिता गोंदकर, भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी आणि बालकलाकार कृष्णादत्त आदी सहकलाकारांच्या भूमिका आहेत. 


दिल्लीच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला परिक्षकांच्या विशेष पसंतीचा पहिला पुरस्कार मिळाला आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारांमध्ये या चित्रपटासाठी अनिल गांधी यांना सर्वात्कृष्ट संकलन तसेच विजय गवंडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात अभिनेते सुहास पळशीकर यांना सर्वात्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे.