Sinhasanadhishwar : शिवराज्याभिषेक म्हणजे पारतंत्र्याच्या जोखडातून रयतेला मुक्त करीत, अभिमानाने स्वातंत्र्याचा श्वास घेण्याची संधी मिळाली तो क्षण… माझ्या राजासारखा राज्यकर्ता असावा हे अभिमानाने, छाती फुगवून जगाला ओरडून सांगण्याचा क्षण…  भारतीयांनाच नव्हे तर सर्व जगाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली तो क्षण… प्रतिकूल परिस्थितीतही आपण शत्रूशी सामना करु शकतो ही जिद्द निर्माण करणारा क्षण…  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, राज्याभिषेक करवून घेतला, अखंड हिंदुस्थानाला राजा मिळाला या प्रेरणादायी इतिहासामुळेच पुढे कित्येक वर्षे राजा नसतानाही रयतेने धैर्याने संकटाचा सामना केला. आताच्या शतकातही कित्येकांच्या आयुष्यात उमेद निर्माण करणाऱ्या या सुवर्णक्षणाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथी प्रमाणे 2 जून 2023 रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. 


या सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या दरबारात, राजसदरेवर शकील प्रॉडक्शन्स निर्मित ‘सिंहासनाधिश्वर’ या भव्य मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या सोबत चित्रपटाच्या दिमाखदार पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्माते श्री.शकील खान यांची निर्मिती असलेला आणि श्री.विजय राणे दिग्दर्शित करीत असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हा चित्रपट जून 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी श्री.नितीन पावले, कार्याध्यक्ष - शिवराज्याभिषेक सोहळा,  श्री.सुनील पवार, अध्यक्ष - श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि पदाधिकारी उपस्थित होते.  


शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची आठवण आपापल्या स्वार्थासाठी, सोयीनुसार सगळ्यांनीच केली परंतु महाराजांनी रयतेसाठी केलेल्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगातून आताच्या पिढीने नेमके काय घ्यावे हे मांडण्याचा प्रयत्न निर्माता आणि दिग्दर्शक ‘सिंहासनाधिश्वर’ चित्रपटातून करणार आहेत. 350 वर्षांपूर्वीचा महाराजांचा भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळाही या चित्रपटात  पहायला मिळणार आहे. 


हेही वाचा : Ashish Vidyarthi म्हणाले... दुसऱ्या लग्नावर आणि घटस्फोटावर मुलाची अशी होती प्रतिक्रिया


हिंदी चित्रपट, अनेक मालिका आणि शॉर्ट फिल्म्सच्या निर्मितीनंतर शकील खान यांनी ‘सिंहासनाधिश्वर’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘राजा शिवछत्रपती’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, अशा वेगवेगळ्या मालिका देव अवतारी 'बाळूमामा', 'पॉवर', 'रुदन' यांसारखे चित्रपट आणि असंख्य इव्हेंटच्या माध्यमातून विजय राणे यांनी आपली दिग्दर्शकीय स्किल्स दाखविली आहेत. तर ‘सिंहासनाधिश्वर’ या आगामी भव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा रसिकांना पहायला मिळणार आहे