मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त
Marathi Movies : बऱ्याचदा, काही नव्या विषयांना हात घालणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात तेव्हा त्यांना कमालीचा प्रतिसाद मिळतो. पण, मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र वेगळं चित्रं आहे.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: Aatmapamphlet : 'आत्मपॅम्फ्लेट' हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. परेश मोकाशी लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित हा सिनेमा आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाचे सध्या समीक्षक आणि कलावंतांकडून कौतुक केले जाते मात्र खंत व्यक्त करण्याजोगी बाब अशी की मराठी प्रेक्षक मात्र या उत्कृष्ट कलाकृती पाहण्यासाठी चित्रपट गृहाकडे फिरकताना दिसत नाहीयेत. एकीकडे मराठी चित्रपट चालत नाहीत अशी मराठी प्रेक्षकांची कायम ओरड असते मात्र चांगली कलाकृती आली की थेटर मध्ये प्रेक्षकांचा शुकशुकाट असतो जर अशी परिस्थिती असेल तर मराठी चित्रपट कसे तरतील असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.
नेमकं काय चुकतंय?
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर या चित्रपटाबाबत आपली भावना व्यक्त करताना म्हणाले, 'आत्मपॅम्फ्लेट हा मराठी चित्रपट पाहिला. हा अतिशय उत्तम सिनेमा आहे, जो भरपूर हसवतो आणि तितकाच विचार करायलाही लावतो. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर देशभरातील सर्व प्रेक्षकांनी पहायला हवा असा झालेला आहे. दुर्दैवाने, जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा आम्ही फक्त पाचजण सिनेमाहॉलमध्ये होतो. मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? एका उत्कृष्ट कलाकृतीला प्रेक्षक मिळतील नसतील तर नेमकं काय चुकतंय आणि हे असं का होतंय, याचा आता निर्माते आणि प्रेक्षक, सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. भविष्यात यासाठी पुढाकार घेऊन जे जे करावं लागेल ते आम्ही करणारच…'
'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाचा संदर्भ देत असे चांगले चित्रपट मराठीत फार कमी बनतात, जर आत्ता त्यांना आपण प्रतिसाद दिला नाही तर दिवसेंदिवस मराठीची अवस्था आणखी बिकट होत जाईल अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली.
अभिनेते वैभव मांगले यांच्यासह अभिनेत्री हेमांगी कवीनंही चित्रपटाचं कौतुक केलं. 'आतापर्यंत मी जगत आलेले आयुष्य किंवा माझ्या पालकांनी ज्या बैठकीत मला वाढवलं ते किती योग्य आहे हे या चित्रपटानं अधोरेखित केलं', असं ती म्हणाली.
खुप दिवसांनी हसवलं, काही काही ठिकाणी तर अक्षर: खिदळवलं, नकळतपणे टाळ्या आणि वाहवाई द्यायला भाग पाडलं ते या चित्रपटाने. थोडक्यात सुरवातीपासून माझ्या चेहऱ्यावर जे स्मितहास्यं उमटवून ते शेवटपर्यंत टिकवलं किंबहुना त्यानंतर ही रेंगाळत ठेवलं ते या चित्रपटाने! खरंतर मला गत आठवणीत रमायला आवडत नाही पण या चित्रपटाने तर माझ्या बालपणातल्या घटनांचा आख्खा album च उघडला माझ्यासमोर आणि मी रमले आणि त्यातून बाहेर पडताना त्रास दिला तोही याच चित्रपटाने! अशा शब्दांत तिनं या चित्रपटाचं कौतुक केलं.
प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनीही या चित्रपटाबाबत आपलं मत मांडलं. आम्ही सहकुटुंब #aatmapamphlet हा एक नितांत सुंदर चित्रपट पाहिला असं म्हणत आताच्या काळात या चित्रपटाची किती गरज होती हे वारंवार बघताना जाणवत होतं असं त्यांनी स्पष्ट केलं. हा चित्रपट चुकवू नका असं आवाहनही त्यांनी प्रेक्षकांना केल.
एकीकडे समीक्षक कलावंत अशा चित्रपटाचे कौतुक करत असताना दुसरीकडे मराठी प्रेक्षकांनी मात्र अशा सिनेमाकडे पाठ फिरवणे कीतपत योग्य असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टी मराठी नाटक मराठी कला टिकवायच्या असतील तर मराठी प्रेक्षकांनी चित्रपट आणि नाट्यगृहाकडे वळायलाच हवं.