Prathamesh Laghate Comment on Mugdha Vaishampayan : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरात पोहोचली. तिने तिच्या गोड आवाजाने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. मुग्धा ही सध्या संगीत क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही यशस्वी कामगिरी करताना दिसत आहेत. मुग्धा वैशंपायनने मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक पदवी प्रदान (दीक्षान्त) समारंभात मुग्धा वैशंपायनला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. मुग्धाच्या या कामगिरीवर तिचा पती आणि गायक प्रथमेश लघाटेने पोस्ट शेअर केली आहे.


प्रथमेश लघाटे काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथमेश लघाटे हा इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असतो. मुग्धाला सुवर्ण पदक मिळाल्यानंतर त्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. प्रथमेशने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने तिचा सुवर्णपदक स्विकारतानाचा आणि ते मिळाल्यानंतरचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने तिचे हटके शब्दात कौतुकही केले आहे. 


"बायको तुझे खूप खूप अभिनंदन, आम्हाला तुझा अभिमान वाटतो", असे प्रथमेश लघाटने म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. प्रथमेशची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. मुग्धानेही ती पोस्ट शेअर करत केली आहे. त्यासोबत तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. 



दरम्यान मुग्धा वैशंपायन ही मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातंर्गत संगीत अधिस्नातक (एम.एफ.ए) (गायन) हा दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यास करत होती. तिने 2021 ते 2023 या काळात हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे यात तिने सर्वाधिक गुण प्राप्त केले आहे. त्यामुळे ती दिवंगत श्री रंजनकुमार एच. वैद्य सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. त्यामुळे मुग्धा वैशंपायनला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मुग्धाचे आई – वडीलही उपस्थित होते.  


यानंतर मुग्धाने लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या. मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळाल्याचा मला प्रचंड आनंद आहे. हा माझ्या आयुष्यातील एक अभिमानास्पद आणि अविस्मरणीय क्षण आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गायन कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यातून वेगवेगळे पुरस्कार मिळतात. पण विशेषतः मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत त्यामध्ये सुवर्णपदक प्राप्त करणे ही माझ्यासाठी खरोखर आनंदाची आणि अभिनयाची गोष्ट आहे, असे तिने यावेळी म्हटले.