मुंबई: काळाच्या ओघात अनेक गोष्टी, माणंस बदलतात हे कितीही खरं असलं तरीही याला काही अपवादही आहेत. या अपवादांपैकीच एक म्हणजे काही कलाकृती. कलाकारांच्या योगदानानं आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादानं संपन्न अशाच कलाकृतींपैकी एक असणाऱ्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला तब्बल ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाविश्वात विनोदाची परिभाषा बदलणाऱ्या आणि असंख्या सिनेरसिकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच. कारण आजही या चित्रपटातील प्रत्येक दृश्य आम्हाला तोंडपाठ आहे, असं अभिमानानं सांगणाऱ्यांचा आकडा आश्चर्यचकित करुन जातो. 


सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता.


अफलातून कलाकार, विनोदी कथानक आणि सादरीकरणाचं कसब अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही ‘बनवाबनवी…’ चांगलीच मुरली, जिची चव प्रेक्षकांमध्ये आजही रेंगाळत आहे. अशा या चित्रपटातील अनेक दृश्य आजही तितकीच लोकप्रिय आहेत. याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ...



चित्रपट प्रदर्शित होऊन आज कित्येक वर्षे उलटली असली तरीही त्यातील अनेक दृश्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. मग ते धनंजय मानेने (अशोक सराफ यांनी) दुधाच्या केंद्रावर रांगेत उभं राहून चक्कर आल्याचं नाटक करणं असो किंवा, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, असं विचारणारा लक्ष्या असो. प्रासंगिक विनोद आणि त्यातून पुढे जाणारा चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. त्यामुळं हा चित्रपट खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट जगताच्या इतिहासात एक महत्त्वाचं पान जोडून गेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.