मुंबई : मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अतीशय महत्त्वाची घटना असणाऱ्या पानिपतच्या युद्धावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' या चित्रपटाच्या ट्रेलर मागोमाग आता चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं मोठ्या दणक्यात प्रदर्शित करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मर्द मराठा' असे बोल असणाऱ्या या गाण्याची ध्वनीफित सर्वप्रथम प्रेक्षकांच्या भेटीला आली ज्यामागोमाग गाणं ऐकल्यानंतर ते नेमकं कसं दिसेल याचा तर्क लावला जात असतानाच गाण्याचा व्हिडिओसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. मराठा साम्राज्याचा दृढ विश्वास, धाडस, साहसी वृत्ती, जिद्द अशा विविध भावांचं उत्कट दर्शन गाण्यातून होतं. 


ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी, त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी, यांच्यासह इतरही मराठी कलाकार या गाण्यात पाहायला मिळतात. फक्त सदाशिव राव साकारणाऱ्या अर्जुन कपूरवरच लक्ष केंद्रीत न करता या चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पात्रांर गाण्याच्या निमित्ताने दृष्टीक्षेप जातो. 



ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर लिखित या गीताला अजय- अतुल या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं आहे. तर, अजय- अतुल, सुदेश भोसले, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदोडकर, पद्मनाभ गायकवाड, प्रियांका बर्वे यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्याचे बोल ऐकताना आणि या गाण्याचं चित्रीकरण पाहताना चित्रपटात्या भव्यतेचा अंदाज लावता येत आहे. त्यातही, रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी ही वडील- मुलाची जोडी पडद्यावर मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तीरेखा साकारत असल्यामुळे चाहत्यांसाठी 'पानिपत' बऱ्याच कारणांनी खास ठरणार हे नक्की. 


'पानिपत'च्या युद्धाला केंद्रस्थानी ठेवत साकारण्यात येणारा हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारणार आहे.