मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता फासे उलडे पडू लागले आहेत. पूर्वी आपल्या यशामुळे मुजोरीत असणारा गुरु बिचारा झाला आहे. तर बिचारी राधिका आता कर्तबगार झाली आहे. शनायाच्या जाळ्यात पूरता फसलेला गुरू आता चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. पण त्याची मुजोरी काही कमी झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमोशन गेम करुन आईकडून पैसे उकळणाऱ्या गुरुला राधिका चांगलच सुनावते. त्यावेळेस आता नेमकं काय करावं, हे गुरुला सुचत नाही. मग तो ऑफिसमधल्या सरांची माफी मागण्याचा पर्याय निवडतो. पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. याउलट राजवाडे सर कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी राधिकाला फोन करतात. त्यावेळेस राधिकाची मनःस्थिती द्विधा होते. एकीकडे गुरुची होणारी अधोगती तिला दुखावते तर दुसरीकडे तिचं स्वप्न तिला खुणावतं.


आता नक्की राधिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राधिकाने जर गुरुची कंपनी विकत घेतली तर शनाया-गुरुला राधिकाच्या हाताखाली काम करावं लागणार, यात काहीही शंका नाही. पण आता पुढे काय होणार? काय नवे धमाके पाहायला मिळणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा माझ्या नवऱ्याची बायको.