मुंबई: #MeToo प्रकरणी लेखिका विनता नंदा यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला.  अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर कलाविश्वात याविषयीच्या चर्चांना बरंच उधाण आलं. काही प्रसिद्ध प्रस्थांची नावं यात पुढे आली. आलोकनाथ यांचं नाव यात पुढे येणं हे अनेकांसाठीच धक्कादायक होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनता नंदा यांनी केलेल्या आरोपांनंतर इतरही काही अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. 


विनता यांनी लावलेले सर्व आरोप आलोकनाथ यांनी फेटाळत उलटपक्षी त्यांच्यावरच अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.  


विनता यांनी आलोकनाथांची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिल्याचं सांगत त्यांच्या वकीलांनी हा लढा आता कायद्याच्या मदतीने लढला जाणार असल्याचा इशारा दिला. 


एकिकडे या सर्व चर्चा सुरु असतानाच खुद्द विनता यांनी सोशल मीडियावर एक पत्र लिहित थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. 


सर्वच महिलांना अशा पूरक परिस्थितीची निर्मिती करुन द्या जेथे त्या अशा मुद्द्यांवर खुलेपणाने बोलू शकतील, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानाना केली आहे. 


#MeToo या चळवळीमध्ये अनेकांनीच मोठ्या धाडसाने आवाज उठवला नसता तर, आम्ही कधीच व्यक्त होऊ शकलो नसतो, असंही त्या या पत्रातून म्हणाल्या. 


आपला देश हा महिलांसाठी नसल्याचं म्हणणाऱ्या सर्वांना तुम्ही खोटं ठरवा. कारण प्रत्येक महिलेला तुमचा पाठिंबा आहे हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. पीडितांना तुमच्या पाठिंब्याचीच गरज आहे, त्यांना न्याय मिळवून द्या, अशी विनंती विनता यांनी केली आहे. 



नवरात्रोत्सवाचा संदर्भ जोडत अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला प्रेरणा द्या असं म्हणत विनता यांनी पंतप्रधानांकडेच मदत मागितली आहे. 


विनता यांची हाक मोदींपर्यंत पोहोचणार का? आणि ती पोहोचल्यानंतर मोदी त्यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.