`या` व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या रानू मंडल रातोरात प्रसिद्धीझोतात
एखाद्याच्या आयुष्याला कधी, केव्हा, कुठे आणि कशी कलाटणी मिळेल याविषयी काहीच सांगता येत नाही.
मुंबई : एखाद्याच्या आयुष्याला कधी, केव्हा, कुठे आणि कशी कलाटणी मिळेल याविषयी काहीच सांगता येत नाही. मुळात अनपेक्षित वळणांची आनंददायी, आव्हानात्नक आणि खूप काही शिकवून जाणारी ही वाट म्हणजेच आयुष्य. सध्या याच अनपेक्षित आयुष्याचा आणि नशिबाचा खेळीचा खरा प्रत्यय येत आहे तो एका व्यक्तीला.
कोलकात्यातील एका रेल्वे स्थानकावर लता मंगेशकर यांनी गायलेल्या 'एक प्यार का नगमा है...' या गाण्याला आपल्या आवाजात सादर करणारा हा चेहरा म्हणजे रानू मंडल यांचा. रानू हे नाव आता कोणासाठीच अनोळखी नसावं. कारण, फक्त एका व्हिडिओच्या माध्यमातून असंख्यजणांपर्यंत रानू यांची कला आणि जीवनापुढे हतबल असणारी त्यांची परिस्थिती पोहोचली. बस्स...., पुढे सारी किमया केली ती या सोशल मीडियानेच.
'डेली मेल'च्या वृत्तानुसार रानू यांचा चेहरा किंवा त्यांची कला साऱ्या जगापर्यंत पोहोचवण्यापूर्वी त्याविषयी पहिल्यांदाच माहिती मिळाली होती ती म्हणजे स़ॉफ्टवेअर इंजिनिअर, अतिंद्र चक्रवर्ती याला. एक दिवस दिवंगत पार्श्वगायक, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या एका गाण्याचे सूर आळवणाऱ्या रानू यांच्यावर अतिंद्रची नजर पडली. ज्यानंतर त्याने रानू यांना एक प्यार का नगमा है हे गाणं गाण्याची विनंती केली.
रानू हे गाणं गात असतानाच अतिंद्रने त्यांचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. पाहता पाहता सोशल मीडियावर अतिंद्रने पोस्ट केलेला व्हिडिओ खऱ्या अर्थाने व्हायरल झाला आणि रानू यांचा आवाज साऱ्या देशात पोहोचला. किंबहुना परदेशापर्यंतही गेला असं म्हणायला हरकत नाही.