मुंबई : काही दिवसांपूर्वी गायिका श्वेता पंडीत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संगीतकार अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत अनेकांचच लक्ष वेधलं. २००१ मध्ये रेकॉर्डींग स्टुडिओमध्ये त्यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तिने मलिक यांना आरोपीच्या पिंजऱ्यात खेचलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिक यांच्यावर झालेलेल हे आरोप पाहता त्यांनी ते फेटाळून लावलेले होते. गीतकार समीर अंजान यांनीही मलिक यांचीच बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. 


श्वेता जे काही सांगत आहे, तसं काहीच घडलं नव्हतं असं म्हणत समीर अंजान यांनी अनू मलिक यांची बाजू घेतली होती. पण, तिच्या आरोपांमागोमागच आणखीही दोन महिलांनी अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. 


सध्याच्या घडीला अनू मलिक यांच्यावर होणारे हे सर्व आरोप पाहता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं कळत आहे. 


'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदावरून त्यांचा पायउतार केला जाणार असल्याचं चिन्ह सध्या पाहायला मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 


मलिक यांच्यावर हे आरोप झाल्यापासून वाहिनीच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये याविषयीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर परीक्षक पदावरून त्यांना हटवण्याचा महत्त्वाच्या निर्णयावर ते पोहोचल्याचं कळत आहे. 


लवकरच याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. असं झाल्यास मलिक यांच्याविरोधात कारवाईचं हे पहिलं आणि तितकच कठोर पाऊल ठरेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.