#MeToo: अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा
जाणून घ्या कोणी केला त्यांच्यावर हा दावा?
मुंबई: काही दिवसांपूर्वीच फँटम फिल्म्समध्ये काम करणाऱ्या एका महिलेने विकास बहल याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. ज्यानंतर आता विकास बहल याने 'फँटम फिल्म्स'मधील त्याचे पार्टनर अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने या दोघांवर अब्रुनुकसानीचा तब्बल 10 कोटींचा दावा ठोकला आहे.
बुधवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान विकास बहलने आरोप करणाऱ्या महिलेला प्रतिवादी बनवलं असून सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 19 ऑक्टोबरला होणार आहे.
'क्वीन' फेम दिग्दर्शक विकास बहल याने अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्याही वक्तव्यांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी विकासने केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामध्ये अनुराग आणि विक्रमादित्यची वक्तव्य ही विकासच्या प्रतिमेला मलिन करत असल्याचं म्हटलं आहे.
हा दावा करत अनुरागकडून 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, हे प्रकरण दोन्ही पक्षांकडून परस्पर सामंजस्याने सोडवण्याची विचारणा न्यायालयाकडून करण्यात आली आहे.
एकंदरच सर्व परिस्थितीला मिळालेलं गंभीर वळण पाहता येत्या काळात पुढे नेमकं काय घडणार, याकडेच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
2015 मध्ये 'बॉम्बे वेल्वेट' या चित्रपटाच्या वेळेस फँटम फिल्म्समध्ये काम करणाऱ्या एका महिलेने विकास बहलने आपलं लैंगिक शोषण केल्याचं म्हणत त्याच्यावर आरोप केले होते.