मुंबई : संपूर्ण कलाविश्वात चर्चेत असणाऱ्या #MeToo प्रकरणी एका बॉलिवूड दिग्दर्शकाला क्लीन चीट देण्यात आली आहे. एका मॉडेल- अभिनेत्रीकडून दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर विनयभंगाचे गंभीर आरोप करण्यात आले होते. ज्यानंतर अनेक चर्चा आणि प्रश्नांनी डोकं वर काढलं होतं. पण, अखेर या प्रकरणातून त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करतेवेळी मुंबई पोलीसांनी याविषयीची माहिती दिली. घई यांच्याविषयी करण्यात आलेल्या आरोपांचे कोणतेच पुरावे उपलब्ध सापडल्यामुळे ही तक्रार रद्द करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. 


मॉडेल आणि अभिनेत्री केट शर्मा हिने काही दिवसांपूर्वी घई यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. घई यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलवत किस करत आणि मिठी मारत आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. तिने केलेले हे सर्व आरोप घई यांनी फेटाळून लावले होते. इतकच नव्हे, तर कामाच्या ठिकाणी आणि घरी आपण महिलांचा आदर करतो, असंच ते म्हणाले होते. 


हा सर्व प्रकार पाहता घई यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या टीमकडून एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे. 'घई यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलीसांनी केट शर्मा हिला पोलीस स्थानकात हजर होण्यास सांगितलं. ज्यानंतर २२ ऑक्टोबरला ती पोलीस स्थानकात हजर झाली. तेव्हा तिने या प्रकरणात पोलिसांकडून तक्रारीसंबंधी काही वेळ मागितला. २२ ऑक्टोबरनंतर ती पुन्हा एकदा १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्थानकात आली. पण, यावेळी मात्र तिने तक्रार रद्द करण्याचा निर्णय समोर ठेवत या प्रकरणाला पूर्णविराम देणार असल्याचं स्पष्ट केलं. यामागे काही खासगी कारणं असल्याचंही ती म्हणाली', असं त्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 



अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्यानंतर #MeToo हे प्रकरण संपूर्ण कलाविश्वात एका चळवळीच्या रुपात समोर आलं. ज्याअंतर्गत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या अशा प्रसंगांना वाचा फोडत बी- टाऊनमधील काही बड्या प्रस्थांवर गंभीर आरोप केले होते.