मुंबई : 'सेक्रेड गेम्स', 'मिर्झापूर', 'क्रिमिनल जस्टिस' अशा प्रचंड गाजलेल्या वेब सीरिजच्या आणि 'स्त्री' सारख्या अतिशय मनोरंजक चित्रपटांतून एक नाव चांगलच प्रसिद्धीझोतात आलं. अभिनय आणि एक कलाकार म्हणून तो चेहरा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. सध्याच्या घडीला चर्चेत असणारा तो चेहरा म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठीचा. आपल्या अभिनयाच्या बळावर पंकजने थेट पाटण्याहून मुंबई गाठली आणि पाहता पाहता मोठ्या जिद्दीने त्याने या क्षेत्रात आपले पाय रोवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशाच्या वाटेवर निघालेल्या या अभिनेत्याने मुंबईत, समुद्रकिनारी एक घरही घेतलं. या स्वप्नांच्या घरात प्रवेश करतेवेळी फक्त पंकजची पत्नीच नव्हे तर तो स्वत:ही भावूक झाला होता. यावेळी जुन्या घराच्या आठवणींनी तो गतकाळात पोहोचला होता. 'हिंदुस्तान टाईम्स'ने याविषयी वृत्त प्रसिद्ध केलं. आपली पाळंमुळं न विसरता यशशिखराची वाट सर करणाची वृत्ती हीच पंकजच्या यशाचं रहस्य आहे हेही तितकच खरं. 


नव्या घरात प्रवेश करताना काही आठवणींना उजाळा देत पंकज म्हणाला, 'आज मी आणि माझी पत्नी मृदूला, आम्ही स्वत:च्या घरात प्रवेश केला आहे. आम्ही या स्वप्नांच्या घराचे मालक आहोत. पण, आजही पत्र्याचं छत असणारं पाटण्यातील एका खोलीचं घर मी विसरलेलो नाही. एके रात्री जोराचा पाऊस आणि वारा सुरु झाल्यामुळे त्या घराच्या छताचा काही भाग उडून गेला होता. मी आपला त्या मोकळ्या जागेतून आभाळाकडेच पाहात पाहिलो होतो', असं तो म्हणाला. नव्या घरात प्रवेश करतेवेळी या आठवणी जागवणारा पंकज पाहता तो, आपली मुळ परिस्थिती आणि पाळंमुळं विसरलेला नाही हेच स्पष्ट होत आहे. 


सध्या 'क्रिमिनल जस्टिस'मधील भूमिकेसाठी पंकजवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. खुद्द अभिनेता मनोज बाजपेयी यानेही पंकजची प्रशंसा केली आहे. किंबहुना तोच पंकजच्या प्रेरणास्थानीही आहे. बिहारच्याच एका खेड्यातील मनोज बाजपेयी मुंबईत येऊन अभिनेते होऊ, शकतात मग आपण का नाही? या एकाच ध्यासाने पंकजने आपल्या कारकिर्दीती उल्लेखनीय कामगिरी केली. 'एकेकाळी समोर येईल ती भूमिका स्वाकारणारे आपण, आज अशा स्थानी पोहोचलो आहोत, जेथे भूमिकांची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे', ही बाब त्याने मोठ्या अभिमानाने सांगितली. 


अभिनय क्षेत्रात कष्टाने नावारुपास आलेल्या पंकजला त्याच्या या प्रवासात अनेक व्यक्तींची साथ लाभली. ज्यांचा तो आजही ऋणी आहे. या साऱ्यामध्ये त्याची पावलोपावली साथ देणारी पत्नी मृदूला हिचासुद्धा मोलाचा वाटा आहे. सध्या स्वत:च्या घरात स्वछंदपणे वावरणारा हा अभिनेता येत्या काळातही त्याच्या या कौशल्याच्याच बळावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.