मुंबईत काम कसं मिळतं याची खबरदारी घेतली जाईल? मनसेचा बिग बॉसच्या स्पर्धकाला इशारा
मनसेचा कुमार सानूच्या मुलाला इशारा
मुंबई : सध्या बिग बॉसचा १४ व्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. या सीझनमधील स्पर्धक आणि त्यांची भाषा यामुळे बाहेर गदारोळ मांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू त आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. यावरून आता वाद पेटला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला इशारा दिला आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विट आणि व्हिडिओ द्वारे जान सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. 'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,' असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला.
काय आहे प्रकरण?
'माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,' असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटले आहे.
मनसेच्या अमेय खोपकरांनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. 'जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दात अमेय खोपकरांनी राग व्यक्त केला.