`आपण सुधारलं पाहिजे`, स्टेजवरच संकर्षणला राज ठाकरेंच्या कानपिचक्या; म्हणाले, `त्या दिवशी..`
MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाला अशोक सराफ, प्रशांत दामले, महेश कोठारे यासारखे दिग्गज मंचावर असताना राज ठाकरेंनी संकर्षणसंदर्भात भाष्य केलं.
MNS Chief Raj Thackeray On Sankarshan Karhade: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या विशिष्ट भूमिकांसाठी ओळखले जातात. मराठी पाट्यांचा मुद्दा असो, निवडणुकीच्या काळातील शिक्षकांच्या कामांचा मुद्दा असो किंवा कलाक्षेत्रातील एकादी गोष्ट असो राज ठाकरेंच्या प्रतिक्रिया अगदी मार्मिक असतात. काही आठवड्यांपूर्वीच राज ठाकरेंनी नाट्य संमेलनामध्ये अशीच एक भूमिका मांडली होती. याच भूमिकेवरुन राज ठाकरेंनी प्रसिद्ध मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला स्टेजवरुनच कानपिचक्या दिल्या.
कोणत्या कार्यक्रमात बोलत होते राज ठाकरे?
नाट्य अभिनेते प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि (PAC) अंतर्गत 'तिकिटालाय'ॲप मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत लॉन्च केलं. या ॲप मराठी सिनेमा,नाटक,गाण्यांचे-कवितांचे, संगीताचे कार्यक्रम, विनोदी प्रहसनांची तिकीट उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते 'महाराष्ट्रभूषण' अशोक सराफ, ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी 'तिकिटालय' लॉन्च करण्यात आलं. याच कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी अभिनेता संकर्ष कऱ्हाडेला प्रेमळ शब्दांमध्ये त्यांच्या भूमिकेची आठवण करुन दिली.
संकर्षणला राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या संकर्षणने कार्यक्रमादरम्यान एका वाक्यात 'चंकु सर' असा उल्लेख केला. राज ठाकरेंना हा उल्लेख खटकला. राज ठाकरे या कार्यक्रमात बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी पहिल्याच वाक्यात यावरुन संकर्षणचे कान धरले. राज ठाकरेंनी स्टेजच्या डाव्या विंगेत उभ्या असलेल्या संकर्षणकडे पाहत, "संकर्षणजी, त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. तर 'चंकु सर' असं काही नसतं. चंद्रकात कुळकर्णी सर मी समजू शकतो. 'चंकु' असं काही नसतं त्यामुळे आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजेत," असं राज यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
राज ठाकरेंची मिश्कील प्रतिक्रिया
पुढे बोलताना राज ठाकरेंनी अभिनेता आनंद इंगळेच्या टोपणनावावरुन मजेदार प्रतिक्रिया नोंदवली. "त्या दिवशी श्रीरंग गोडबोले आले होते. त्यांनी मला सांगितलं की मी कॅफेत गेलो होतो त्यांना मी सांगितलं की 2 आनंदरावांची ऑमलेट द्या. कारण आता अंड्या बोलाचं नाही म्हटल्यावर..' असं म्हणत राज हसू लागले. 'कोणी कसा सल्ला घेईल काय माहिती', असंही राज पुढे म्हणाले.
राज ठाकरेंनी केलं कौतुक
'मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. नवनव्या संकल्पना येणं खूप गरजेचं आहे. 'तिकिटालय' ची संकल्पना नक्कीच स्तुत्य असून याचा फायदा करून घेणं महत्त्वाचं असल्याचं राज ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितलं.