चुकीचा Haircut केला म्हणून द्यावी लागली 2 कोटींची भरपाई
चुकीचा हेअरकट सलूनला चांगलाच महागात पडला
मुंबई : अनेकदा सलून, पार्लरमध्ये गेल्यावर असंही घडतं ज्यावेळी मनाजोगता हेअरकट केला जात नाही. अशा वेळी ग्राहकांच्या हाती येतो तो म्हणजे मनस्ताप. पण, सध्या देशात अशी एक घटना घडली आहे, जिथं सलूनला चुकीच्या पद्धतीनं केस कापण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. एका मॉडेलसोबत हे सारं घडलं असून, राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं केस कापणाऱ्या सलूनला 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास बजावलं आहे.
ITC Maurya मध्ये आहे सलून
राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) नं बजावलेलं हे सलून दिल्लीमध्ये आहे. दिल्लीतील पंचतारांकित आयटीसी मौर्य येथे हे सलून आहे, जिथं 2018 मध्ये आशना रॉय ही तिच्या हेअर ट्रीटमेंटसाठी गेली होती. ती एका प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करत होती. अनेक बड्या ब्रँडसाठी तिनं मॉडेलिंग केलं होतं.
आशनाच्या सांगण्यानुसार सलूननं तिच्या सांगण्याच्या पूर्णपणे उलट पद्धतीनं केस कापले. ज्यामुळं तिला अनेक प्रोजेक्ट आणि चित्रपटांना मुकावं लागलं. परिणामी यामुळं तिला मोठं आर्थिक नुकसानही झालं. सलूनच्या चुकीमुळं तिच्या राहणीमानातील बदलासोबतच टॉप मॉडेल होण्याचं स्वप्नही तुटलं.
सलूननं नेमकं काय केलं?
आशनाच्या सांगण्यानुसार तिनं सलूनमध्ये समोरून लांब फ्लिक्स ठेवत मागून केस चार इंच कापण्यास स्पष्टपणे सांगितलं होतं. पण, हेअर ड्रेसरनं त्यांच्याच मर्जीनं तिचे लांबसडक केस कापले.
मॉडेलनं ज्यावेळी सदर प्रकरणी तक्रार केली तेव्हा तिनं फ्री हेअर ट्रीटमेंटचा उल्लेख केला. आशनाचा दावा आहे की, यादरम्यान, काही रसायनांचा तिच्या केसांना त्रास होऊन त्यांचं नुकसान झालं. हे संपूर्ण प्रकरण आशनानं राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) यांच्याकडे नेलं आणि तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. पण, सध्या तरी तिला 2 कोटी रुपयांचीच नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. येत्या आठ आठवड्यांच्या आत ही रक्कम आशनापर्यंत पोहोचणं अपेक्षित असेल,