जॅकलीन आणि नोराचं तिहार जेलमधील महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत काय कनेक्शन? वाचा संपूर्ण प्रकरण
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणी चौथ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात पोहोचली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणी चौथ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात पोहोचली आहे. ईडीने जॅकलीनला सुकेश चंदाशेखर 200 कोटींच्या जामीन प्रकरणात समन्स बजावले होते. याच प्रकरणात 14 नोव्हेंबर रोजी अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली होती. आता या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
जॅकलिन-नोरा यांना एक महागडी कार भेट देण्यात आली
असं सांगितलं जात आहे की, तिहार जेलमधील महाठग सुकेश चंद्रशेखरने चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक आलिशान कार भेट दिली होती. एवढंच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेही समोर आलं आहे की, सुकेशने नोरा फतेहीला एक आलिशान कारही भेट दिली होती. आता सुकेश दोन्ही अभिनेत्रींसाठी अलिशान बंगले गिफ्ट करण्याची तयारी करत होता. यामुळे ईडी दोन्ही अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलावते होतं.
खंडणीचे पैसे वापरुन कार भेट देण्यात आली
या व्यतिरिक्त, सुकेशने साजिद नाडियाडवालाला मोठ्या रकमेचं आश्वासन दिले होतं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गिफ्ट केलेल्या गाड्या खंडणीच्या पैशातून खरेदी करण्यात आल्या होत्या. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखरला त्याची पत्नी आणि मल्याळम अभिनेत्री लीना पॉलला बॉलिवूड चित्रपटात लॉन्च करायचं होतं. मद्रास कॅफे चित्रपटात लीनाला सुकेशने मोठी रक्कम देऊन भूमिका दिली होती.
सुकेशला लीना पॉलला बॉलिवूडमध्ये आणायचं होतं
सुकेश चंद्रशेखरनेही अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांशी बोलून पत्नीला बॉलिवूडमध्ये आणलं. या निर्मात्याला आणि दिग्दर्शकांना पैशाचं कोणतेही टेन्शन घेऊ नका असंही सांगितलं होतं. तिहार जेलमध्ये आरामात राहण्यासाठी सुकेशने करोडो रुपये खर्च केले होते. आता सुकेश आणि त्याची पत्नी लीना ईडी रिमांडमध्ये आहेत.
सुकेश चंद्रशेखर आणि लीना पॉल जेलमध्ये
सुकेश चंद्रशेखरला पोलिसांनी या वर्षी 2021 मध्ये अटक केली आहे. सुकेशवर तुरुंगात बसून 200 कोटींच्या वसुलीचे मोठं रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. सुकेशने कारागृहातून एका सुप्रसिद्ध व्यावसायिकाच्या पत्नीकडून 50 कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रकरण समजून घेऊन पोलिसांनी जेव्हा तुरुंगावर छापा टाकला तेव्हा त्यांना सुकेशच्या सेलमधून 2 मोबाईल फोनही मिळाले. या प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलही तुरुंगात आहे.